पुणे । राज्यात सरकारी शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा बनविणार असल्याची घोषण शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच केली असताना येत्या शैक्षणिक वर्षात मुक्त शाळाही सुरू करण्यात येणार आहेत. या शाळा येत्या वर्षात सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. या मुक्त शाळांसाठी स्वतंत्र अभ्यासमंडळ तसेच स्वतंत्र अभ्यासक्रम असणार आहे.
राज्यात मुक्त शाळा सुरू होणार असल्याचे 2016 सालीच जाहीर करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून या शाळांचा आराखडा ठरविणे, अभ्यास मंडळे नेमणे, अभ्यासक्रम ठरविणे याबाबी सुरू आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात या मुक्त शाळा सुरू होणार आहेत. या मुक्त शाळा या राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या धर्तीवर राज्य पातळीवर तयार करण्यात येणार आहेत.
चार समकक्ष स्तरांवर परीक्षा
या मुक्त शाळा चार स्तरांमध्ये चालणार आहेत. इयत्ता पाचवी, आठवी, दहावी व बारावी अशा चार समकक्ष स्तरांवर ही परीक्षा देता येईल. एखाद्या विद्यार्थ्याला जर पाचवीची परीक्षा द्यायची असेल तर त्याची वयाची दहा वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक स्तराच्याबाबतीत वय निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान मुक्त शाळांच्या रचनेबाबत शिक्षण विभागाकडून गुप्तता बाळगली असून याचीही घोषण शिक्षणमंत्री करणार असल्याची चर्चा शिक्षण विभागात आहे.
मुक्त शाळांचा स्वतंत्र अभ्यासक्रम
मुक्त शाळांमधील अभ्यासक्रम हा आपल्या नियमित अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असून याची काठिण्य पातळी कमी असणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मुक्त शाळेतून एखादी परीक्षा द्यायची असेल तर त्यांना ती परीक्षा देता येणार आहे.
विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेचा विषय निवडता येणार
पहिल्या स्तरासाठी तीन भाषा, परिसर आणि गणित हे विषय असतील. उच्च प्राथमिक स्तरासाठी तीन भाषा, सामाजिक शास्त्र, विज्ञान, गणित, कौशल्य विकास, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष विषय असे आठ विषय आहेत. विद्यार्थ्यांना यापैकी दोन भाषांसह कोणतेही पाच विषय निवडण्याची मुभा असेल. दहावी समकक्ष परीक्षेत मातृभाषा तसेच अन्य एक अशा दोन भाषा सक्तीच्या असणार आहेत. भाषेतर विषयात आठ विषयांचे पर्याय देण्यात आले असून विद्यार्थी त्यापैकी कमाल तीन विषयांची निवड करू शकतील. तर व्यावसायिक विषयांपैकी कमाल एक विषय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना असेल. एकूण पाच विषयांची परीक्षा होणार आहे, तर बारावीसाठी दोन भाषा आणि कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील कोणतेही तीन विषय विद्यार्थ्यांना निवडता येणार आहेत.