पुणे। राज्यात शनिवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. येत्या 72 तासात राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरुपाचा तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. रविवारी शहरात मात्र कोरडा दिवस होता.
शनिवारी विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणांचा अपवाद वगळता विशेष पावसाची नोंद झाली नाही. कोकण किनारपट्टी ते केरळ दरम्यान समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने कोकणातील पावसाचे प्रमाण कायम आहे. त्याचबरोबर हवेच्या वरच्या थरातील चक्रीवादळ सौराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र येथे आहे. मात्र विदर्भातील हवेच्या वरच्या थरातील चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील हवेच्या वरच्या थरातील चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याचा अंदाज असून यामुळे राज्याच्या बहुतांश भागांतील पावसाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.