नागपूर: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरु आहे. काल पहिल्या दिवशी सावकारांच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ झाले. आज मंगळवारी दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधिमंडळात गदारोळ झाल्याने दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित झाले. दरम्यान शेतकऱ्यांसाठी येथे गळा काढण्यापेक्षा केंद्राकडे गळा काढा, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधक भाजपला लगावला. केंद्राकडून राज्याला येणारा जीएसटी परतावा जवळपास 15 हजार कोटी रुपये आहे. केंद्राने पहिला हफ्ता साडेचार हजार कोटी रुपये आलेले आहे. शिमगा करायचा असेल तर केंद्रा सरकारच्या नावाने करावा, राज्य सरकारच्या नावाने करु नका असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
प्रश्न मांडायचे असतील तर ही पद्धत नाही. बोंबलून प्रश्न मांडता येत नाही. सरकार बदलल्यानंतर जनतेच्या मनात आनंद अपेक्षा, आशा पल्लवित झाल्या आहेत त्या खुरडण्याचा प्रयत्न करता येणार नाही. मुख्यमंत्री म्हणून जनतेला न्याय देण्याचं काम मी करत आहे असा विश्वास उद्धव ठाकरेंनी बोलून दाखविला.
युवकांना बिथरवू नका
देशात आणि राज्यात अस्थिरतेचे, अशांततेचे वातावरण निर्माण केले जाते. दिल्लीच्या विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांवर गोळीबार केला जालियनवाला बाग हत्याकांडासारखे वातावरण देशात निर्माण केल जातेय का? अशी शंका उपस्थित होते. संपूर्ण जगात भारत सर्वाधिक जास्त तरुण असलेला देश असणार आहे. त्यामुळे ही युवाशक्ती आहे, बॉम्ब आहे याची वात पेटवण्याचा प्रयत्न करु नये अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर घणाघात केला आहे.