बंगळुरू । भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा हे वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. एका दलिताच्या घरी जाऊन कुटुंबीयांसोबत जेवल्याचे प्रकरण त्यांच्या अंगाशी आले आहे. येदियुरप्पा यांनी दलिताच्या घरी जाऊन हॉटेलचे जेवण घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत येदियुरप्पांना हे जेवण चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष येदियुरप्पा हे टुमकूर जिल्ह्याच्या दौर्यावर होते. त्यावेळी ते पक्षाच्या अन्य सदस्यांसोबत एका दलिताच्या घरी गेले होते. तेथे त्यांनी इडली खाल्ली होती. मात्र, ही इडली दलिताच्या घरात तयार करण्यात आली नव्हती. ती हॉटेलमधून मागवण्यात आली होती, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याच कुटुंबातील एका सदस्याने अस्पृश्यतेचा आरोप करीत येदियुरप्पांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. येदियुरप्पा यांच्या या कृत्याने दलित समाजात चुकीचा आणि नकारात्मक संदेश जाईल, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. दलित कुटुंबातील सदस्याच्या आरोपानंतर भाजपने ते फेटाळले. येदियुरप्पा यांच्यावर झालेले आरोप राजकीय हेतूने करण्यात आले आहेत, असे भाजपच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. ज्या लोकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे, त्यांनी या दलित कुटुंबीयांची माफी मागावी, असे भाजपने म्हटले आहे.