निलंबित कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्या तक्रारीने खळबळ
कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे पुन्हा संशयाच्या भोवर्यात
हिरालाल जाधव याच्याकडून थेट मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपतींकडे तक्रार
पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांची येरवडा कारागृहात कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीने गुप्तपणे भेट घेतली असून, ही भेट कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी घडवून आणली आहे, असा खळबळजनक आरोप करत याबाबत थेट कारागृह महानिरीक्षक, मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान कार्यालय व राष्ट्रपतींकडे तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार खुद्द निलंबित कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनीच केली असून, कारागृहाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे या पुन्हा एकदा संशयाच्या भोवर्यात अडकल्या आहेत. एकबोटेंना गुप्तपणे भेटणारा तो नेता कोण? हा प्रश्न आता उपस्थित झाला असून, भाजप सरकार एकबोटे यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन चौकशी करा!
भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर अमानुष हल्ला करण्यात आला होता व हिंसाचार पसरविण्यात आला होता. या गुन्ह्यात संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे हे प्रमुख आरोपी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एकबोटे यांचा जामीन फेटाळल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी 14 मार्चला त्यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. दरम्यान, दिनांक 24 मार्च आणि 25 मार्च 2018 रोजी कारागृहाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी नियमबाह्य पद्धतीने कोणत्याही प्रकारची नोंद न घेता, एका अज्ञात व्यक्तीची एकबोटे यांच्याशी गाठभेट घडवून आणली होती. त्यामुळे साठे यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला आहे, असे हिरालाल जाधव यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. कारागृहात जाताना गेट रजिस्टरला नोंद करावी लागते. मात्र, ही नोंद करण्यात आलेली नाही. येरवडा कारागृहाचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन ते सील करावे, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दूताने एकबोटेंची भेट घेतली का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या एका खास नेत्याने मिलिंद एकबोटे यांची भेट घेतली असावी, अशी शक्यता एका माहितगाराने व्यक्त केली आहे. कारण, घटनेच्या दिवशी येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार हे रजेवर होते. त्यांच्यामुळे त्यांच्याही रजेबाबत हिरालाल जाधव यांनी शंका उपस्थित केली आहे. स्वाती साठे यांनी त्या दिवशी गाडी गेटमधून थेट आतमध्ये आणली होती. त्यांच्यासोबत एक व्यक्ती होती. ही व्यक्ती नेमकी कोण होती? स्वाती साठे या नेहमी अशाच प्रकारे गाडी गेटमधून आतमध्ये आणतात का? सीसीटीव्हीची तपासणी करण्यात येऊन ते बंद असल्यास तसा लेखी अहवाल देण्यात आला आहे का? फोनवरून कळविले असल्यास कोणत्या क्रमांकावरून कळविले असे प्रश्न उपस्थित करून या संपूर्ण घटनेची कायदेशीर चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही हिरालाल जाधव यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल, पंतप्रधान अन् राष्ट्रपतींकडे केली आहे.
अद्याप तक्रारीची माहिती नाही : स्वाती साठे
दरम्यान, जाधव यांची तक्रार अद्याप आपल्यापर्यंत पोहोचली नसून, तक्रार येताच त्याची चौकशी करण्यात येईल, असे अतिरिक्त महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षकांनी सांगितले. तर अशाप्रकारची काही तक्रार आपल्याविरोधात करण्यात आली आहे, याची आपणास कल्पना नाही. मला त्याची काहीही माहिती मिळालेली नाही. तसेच, मला कुणी स्पष्टीकरणही मागितलेले नाही, अशी माहिती कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी दिली. तक्रारअर्ज आल्यानंतरच प्रतिक्रिया देईल, असेही त्यांनी सांगितले.
माझ्या सूत्राकडून मला माहिती मिळाली की, 24 व 25 मार्चच्या दरम्यान स्वाती साठे यांच्या वाहनातून एका अज्ञात व्यक्तीने येरवडा कारागृहात येऊन मिलिंद एकबोटे यांची भेट घेतली आहे. याबाबत आपण वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली असून, चौकशीची मागणी केली आहे.
– हिरालाल जाधव
निलंबित कारागृह अधीक्षक