पिंपरी-चिंचवड : येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात महिला बंदींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कारागृहातील सर्व महिला बंदींची कर्करोग विषयक आरोग्य तपासणी करण्यात आली. मुंबई येथील कॅन कनेक्ट फाउंडेशनचे या शिबिरासाठी सहकार्य लाभले. येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू.टी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले.
50 महिला बंदींची तपासणी
या आरोग्य तपासणी शिबिरात येरवडा मध्यवर्ती कारागृहातील 50 महिला बंदींची कर्करोग विषयक तपासणी करण्यात आली. कॅन कनेक्ट फाउंडेशनच्या वैद्यकीय अधिकार्यांनी ही तपासणी केली. या शिबिरात वैद्यकीय अधिकार्यांनी महिला बंदींना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, व्यायामाचे विविध प्रकार, प्राणायाम यासंदर्भातही माहिती दिली.
मान्यवरांची लाभली उपस्थिती
या आरोग्य तपासणी शिबिरासाठी सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, कारागृह विभागाचे प्रमुख (भा.पो.से.) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.