येरवड्यातील पालिकेच्या गाळ्यांना मुहूर्त कधी?

0

येरवडा- महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून सुभाषनगर भागात उभारण्यात आलेल्या गाळ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून त्याच्या दुरुस्तीसाठी पालिकेच्या वतीने दहा लाख रुपये मंजूर होऊन देखील संबंधित काम बंद अवस्थेत असल्याने पालिकेच्या ह्या गाळ्यांना दुरुस्तीसाठी मुहूर्त कधी? असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.

समाजातील गरजू व्यक्तींना व्यवसाय करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस येथील विद्यालयाच्या पाठीमागील बाजूस लाखो रुपये खर्च करून अंदाजे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बारा गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले असले तरी पण येथील गाळ्यांची दुरवस्था झाली आहे. एका व्यावसायिकाने तर चक्क या गाळ्यांचा वापर गाढवे बांधण्यासाठी केल्यामुळे संबंधित गाळे कोणासाठी? गाढवासाठी की नागरिकांसाठी असा सवाल उपस्थित होत आहे. तर अनेक वाहनचालक हे गाळ्यांसमोरील रस्त्याचा वापर वाहनतळासाठी करत असल्याने या मार्गावरून जाताना अनेक वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करण्याची वेळ येते.