येरवड्यातील मनोरुग्णालायाच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह

0

येरवडा : मनोरुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार व्हावेत, या उद्देशाने शासनाच्या वतीने कोट्यवधी खर्च करून येरवडा-विश्रांतवाडी मार्गावर मनोरुग्णालय उभारण्यात आले असून आशिया खंडात सर्वांत मोठे मनोरुग्णालय म्हणून याची ओळख आहे. याठिकाणी राज्यासह परराज्यातील अनेक मनोरुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. या ठिकाणी पुरुषांसह महिलांचेदेखील मनोरुग्णालय आहे. मनोरुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता राज्य शासनाचे ठेकेदारपद्धतीवर अनेक पदाधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातच रुग्णालयास पुढील व मागील बाजूस दोन प्रवेशद्वार असून एखाद्या रुग्णाने येथून पलायन करू नये. याकरिता रुग्णालयाच्या चोहोबाजूंनी टोलेजंग सरंक्षक भिंत उभारण्यात आली आहे. तरीही येथून रुग्ण पळून जाण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पंधरा दिवसांत अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या असून हे रुग्णालय मनोरुग्णासाठी खरोखर सुरक्षित आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

मनमानी कारभार उजेडात
पंधरा दिवसांपूर्वी एका मनोरुग्णाने कामगारांची नजर चुकवत रुग्णालयातून पलायन केले होते. तो विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथील चौकात येऊन उभा राहिला होता. विशेष म्हणजे या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने एखादी दुर्घटना घडली असती तर यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल रुग्णांच्या नागरिकांकडून करण्यात येत असून रुग्णालयात सुरक्षिततेसाठी कर्मचारी असताना देखील रुग्णाने येथूून पलायन कसे केले? हा मुख्य प्रश्‍न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे येथील अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार उजेडात आला असून पदाधिकारी रुग्णांची सेवा करण्यास असमर्थ ठरल्याचे दिसून येत आहे.

येथील मनसेचे शाखा प्रमुख राहुल छजलानी व कार्यकर्त्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्या रुग्णास मनोरुग्णालयाच्या हवाली केले. अशाच प्रकारे दोन दिवसांपूर्वी एका मनोरुग्णाने चक्क येरवडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येथील पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटनेची दखल घेऊन येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी पोलीस बंदोबस्तात त्याला मनोरुग्णालयात दाखल केले. मनोरुग्ण पळून जाण्याच्या घटना सतत घडत असून यावर योग्य ती उपाययोजना करून याची काळजी घेणे ही मनोरुग्णालयाची जबाबदारी आहे.

…त्यानंतरच दाखल करून घेतले
यासंदर्भात मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बी. एम. डोंगळीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हा रुग्ण हा शिरूर तालुक्यातील असून त्याला उपचारासाठी त्याचे नातेवाईक याठिकाणी घेऊन आले होते. मात्र कोर्टाची परवानगी घेऊन मगच आम्ही त्यास दाखल करून घेऊ असे आम्ही त्यांना सांगितले. तो मनोरुग्ण नातेवाइकांना त्रास देऊ लागल्याने त्यांना शास्त्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये पाठवले. त्यानंतर पोलिसांनीच सर्व कागदपत्रे आणल्यानंतरच त्यास रुग्णालयात दाखल केले असावे, असा दावा डोंगळीकर यांनी केला आहे.