येरवडा । कोरेगाव भीमा, सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद उपनगरात उमटले असून महाराष्ट्र बंदला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. विश्रांतवाडी परिसरात सकाळपासूनच भीमसैनिकांचा जमाव जमल्याने येथे मुकुंदराव आंबेडकर चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येरवडा, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, लोहगाव आदी भागात दुकाने बंद करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विश्रांतवाडी चौकात कार्यकर्त्यांचा जमाव जमल्याने पोलिसांचा रात्रभर खडा पहारा होता.
लोहगाव येथे मोर्चा काढून सकाळपासून लोहगाव पोलीस चौकीसमोर भीमसैनिकांनी तळ ठोकला होता. यावेळी रिपब्लिकन (प्रेसिडियम) पार्टी ऑफ इंडिया व इतर संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. विश्रांतवाडी चौकात गेल्या दोन दिवसापासून बंदची पुकारण्यात आला होता. मोर्चामध्ये महिलांनीही सहभाग नोंदविल्याने या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तणाव निवळण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुसर्या दिवशी देखील परिसरात मुख्य चौकात जमाव मोठ्या प्रमाणात जमला होता. यावेळी काही भीमसैनिकांनी बस बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस बंदोबस्त असल्यामुळे त्यांचा प्रयत्न असफल झाला. सकाळपासूनच परिसरातील सर्व व्यावसायिकांनी बंदला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली होती.
विश्रांतवाडी परिसरात दोन दिवसापासूनच तणावाचे वातावरण असल्यामुळे काही अनुचित घटना घडू नये. यासाठी परिमंडळ-4चे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगीता पाटील, गुन्हे शाखेचे दिलीप शिंदे,वाहतूक नियंत्रण कक्षाचे चिंतामणी केंद्रे व पोलीस कर्मचारी परिसरात काही अनुचित घटना घडू नये. या उद्देशाने रात्रभर तळ ठोकून होते. यावेळी प्रत्येक चौकात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती. तर येणार्या वाहनांची चौकात तपासणी करण्यात येत होती.वडगाव शेरी येरवडा, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, खराडी भागात भीमसैनिकांनी मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. यावेळी दोषींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तर अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
भाजी मंडई-रस्ते शुकशुकाट
नेहमीच विश्रांतवाडी, येरवडा, वडगाव शेरी आदी भागातील भाजी मंडई गजबजलेल्या असायच्या मात्र गेल्या दोन दिवसापासून येथे शुकशुकाट दिसून येत होता. नेहमीच वाहतूककोंडी होणार्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ नव्हती. काही भागात कार्यकर्त्यांनी रस्ते बंद करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या सावधानतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला.