धुळे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमाने 21 जून हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आज जगात तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. जागतिक योग दिनानिमित्त आज धुळ्यात पोलिस कवायत मैदानावर विश्व योग दिन संयोजन समिती आणि जिल्हा प्रशासनातर्फे आज सकाळी 7 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या मुख्य उपस्थित हा सामुहिक योगाभ्यासाचा कार्यक्रम रंगला. तसेच जिल्ह्याभरात आज अनेक ठिकाणी सामुहिक योगासनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
ना.भामरेंच्याहस्ते दिपप्रज्वलन
धुळे जिल्ह्यात मुख्य कार्यक्रम पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर रंगला. याप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महापौर कल्पना महाले, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरण, महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, चंद्रकांत केले, रवी बेलपाठक, अनुप अग्रवाल, संदीप बेडसे, ओमप्रकाश खंडेलवाल, राजेश वाणी, संतोष अग्रवाल आदी उपस्थित होते.
योग विद्येस तीन हजार वर्षांची परंपरा
ना. डॉ. भामरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, योग विद्येस तीन हजार वर्षांची परंपरा आहे. जगाच्या कानाकोपर्यांपर्यंत योग विद्या पोहोचली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक योग दिन साजरा केला जातो. योगाच्या माध्यमातून शरीर व मनाचा सर्वांगीण व्यायाम होतो. त्यामुळे योग जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. नियमितपणे योगाभ्यास केला पाहिजे. त्यामुळे शरीर व मन तंदुरुस्त राहण्यास मदत होईल, असेही मंत्री डॉ. भामरे यांनी नमूद केले. उदघाटन सोहळ्यानंतर योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. त्यात उपस्थित सर्व मान्यवर सहभागी झाले होते. याशिवाय नागरिक, प्रशिक्षणार्थी पोलिस, शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांचे शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जितेंद्र भामरे यांनी योग प्रात्यक्षिकांचे संचलन केले. प्रा. भिकाजी बारसे यांनी आभार मानले. राज्य राखीव पोलिस दलाच्या धुळे येथील मैदानावरही आज सकाळी सामुहिक योगाभ्यासाचा कार्यक्रम झाला. यात देखील शेकडो नागरीक आणि राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा येथेही शाळा, महाविद्यालयांमध्ये आज सकाळी विश्व योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.