वॉशिंग्टन – योग केल्याने म्हातारपणी आकलन आणि स्मृती संबंधात निर्माण होणाऱ्या समस्या टळतात असा दावा ब्राझीलमधील वैज्ञानिकांनी केला आहे. एका संशोधन पत्रिकेत योगाचा असा फायदा सांगत असताना त्यांनी एरोबिक्स आणि योग सारखे नाहीत. ते वेगवेगळे परीणाम साधतात असा उपनिष्कर्षही काढला आहे.
एका वृद्ध महिलेच्या मेंदुच्या प्रतिमा वैज्ञानिकांनी अभ्यासल्या. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आणि स्मृतींशी संबंधित मेंदुच्या अग्रमस्तिष्क या भागाचा अभ्यास त्यांनी केला. त्यांना या भागाच्या डाव्या बाजुकडील बाहेरील संरक्षण आवरण जाड असल्याचे लक्षात आले. हे योगामुळे सुस्थितीत राहीले अन्यथा आवरणाला इजा झाली की आतील स्मृती-आकलनाशी संबंधित भाग खराब होतो. योगामधील व्यायामांनी रक्ताभिसरण नीट होते. ज्याप्रमाणे स्नायु विकसित होतात तसाच मेंदुही विकसित होतो, असे एलिसा कोझासा म्हणतात. ध्यानपद्धतीमधील आकलन आणि लक्ष केंद्रीत करणे या क्रियांना विशेष महत्व आहे, असे कोझासांना वाटते.
आतापर्यंत झालेल्या अभ्यासांमध्ये योग आणि एरोबिक्स सारखेच मानले आहेत. मात्र योगामधून जाणीव, लक्ष आणि स्मृती समृद्ध होतात, असे ब्राझीलच्या वैज्ञानिकांना वाटते. स्मृती आणि आकलनाची समस्या असणाऱ्या वृद्धांना योगाचे प्रशिक्षण दिल्यावर त्यांच्यात फरक पडल्याचे दिसून आले. जे आजिबात योग करीत नाहीत त्यांच्या मेंदुची स्थितीगती वैज्ञानिकांना शोधावयाची होती. त्यानंतरच योगाची उपयुक्तता सिद्ध होणार होती. त्यांनी आठ वर्षे योग करीत असलेल्या २१ योगिनी महिलांची निवड केली. या योगिनींच्या मेंदुचा अभ्यास चुंबकीयअनुनाद तंत्राने (मॅग्नेटिक रिझोनन्स) केला व दुसऱ्या २१ महिला ज्यांनी कधीच योग केला नाही त्यांच्या मेंदुशी तुलना केली. त्यानंतरच योगाच्या वार्धक्यातील उपयुक्तते विषयी फ्रंटीयर इन एजिंग न्युरोसायन्स या जर्नलमध्ये संशोधन वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केले.