भुसावळ शहरासह विभागात ‘जागतिक योग दिन’ उत्साहात ; योग शिक्षकांनी दिले विद्यार्थ्यांना योगाचे धडे
भुसावळ- पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात शाळांच्या मैदानावर जमलेले विद्यार्थी, हातांमध्ये चटई घेवून मैदानावर जाणारे शिबीरार्थी आणि या सर्वांना योगाचे तंत्रशुद्ध धडे देणारे योगशिक्षक अशा उत्साही वातावरणात शाळा, महाविद्यालये, विविध वसाहती, मैदाने, सांस्कृतिक हॉलमध्ये शुक्रवारी ‘जागतिक योग दिन’ भुसावळ शहरासह विभागात उत्साहपूर्व वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहराच्या विविध भागात जनजागृती फेरी व योगासन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
कैद्यांना योग प्रात्याक्षिके
भुसावळ- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने एम.जे.कॉलेजच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड नैचरोपॅथी येथील प्रशिक्षक चित्रा देशपांडे, मनोज रावत, प्रसाद आंबेकर, शीला शर्मा, यश आंबेकर यांनी येथील दुय्यम कारागृहात पोलिस अधिकारी तसेच कैद्यांना योगा प्रात्यक्षिके दिली. यावेळी कारागृह अधीक्षक एम.के.खैरगे, हवालदार सलीम शेख, ज्ञानेश्वर शिंगणे आदी उपस्थित होते. मनुष्याची कार्यक्षमता त्याचे मन, भावना, उर्जा या स्तरावर कार्य करीत असते. व्यापकदृष्ट्या कर्म योग ज्यात शरीरावर प्रयोग केला जातो, आणि ध्यान, योग, साधनांव्दारे मनावर परीणाम होतो. भक्ती योगा द्वारे मनुष्य भावने वर प्रयोग केला जातो. क्रिया योग साधनेव्दारे शरीरातील ऊर्जेवर परिणाम होतो आदी माहिती यावेळी देण्यात आली.
पुं.ग.बर्हाटे विद्यालय
भुसावळ- पुंडलिक गणपत बर्हाटे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांकडून वृक्षासन, ताडासन, पादहस्तासन आदी प्रात्यक्षिक प्रकार घेण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, चेअरमन पी.एस. लोखंडे, संचालक यशवंत भंगाळे , सचिव एस.डी. बर्हाटे, मुख्याध्यापक सुधीर पाटील उपस्थित होते. क्रिडा शिक्षक अनिल बोरोले यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
आर.एस.आदर्श स्कूल
भुसावळ- सिंधी कॉलनीतील आर.एस.आदर्श हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी योग दिन साजरा केला. विद्यार्थ्यांनी विविध आसने, प्राणायाम केले. व्ही. आर. मंगलानी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चेअरमन ग्यानचंद लेखवानी, सेक्रेटरी सुदामदास बठेजा, मुख्याध्यापक एन. सी. मुलचंदानी आदी उपस्थित होते.
बियाणी इंग्लिश मेडीयम स्कूल
भुसावळ- बियाणी इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये योग प्रशिक्षक योग प्रशिक्षक मनोज राऊत यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. बियाणी इंग्रजी व मराठी माध्यमिक स्कूलमध्ये योग प्रशिक्षक मनोज राऊत व सहकार्यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्याक्षिक दिले. विद्यार्थ्यासोबत शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनीही योगाभ्यासाचे धडे घेतले. मुख्याध्यापिका सोफिया फ्रान्सीस यांनी योग प्रशिक्षक राऊस, प्रसाद आंबेकर, चित्रा देशपांडे, शिला शर्मा, यश आंबेकर आदींचे स्वागत केले. शाळेचे संस्थाचालक मनोज बियाणी, संगीता बियाणी आदी उपस्थित होते.
बियाणी पब्लिक स्कूल
भुसावळ- बियाणी इंग्रजी व मराठी माध्यमिक विद्यालयात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षक मनोज राऊत व त्यांचे सहकार्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. शाळेतील शिक्षकांनी योगासने केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सोफिया फ्रान्सिस यांनी योग प्रशिक्षक मनोज कुमार राऊत, प्रसाद आंबेकर, चित्रा देशपांडे, शीला शर्मा, यश आंबेकर यांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.
ताप्ती पब्लिक स्कूल
भुसावळ- आंतरराष्ट्रीय योग दिन ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये सााजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध प्रकारची योगासन प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. प्रात्यक्षिक सादर करतांना शाळेच्या मुख्याध्यापिका नीना कटलर व शिक्षकवृंद उपस्थित होते.
एन.के.नारखेडे स्कूल
भुसावळ- शारदा नगरातील एन.के.नारखेडे स्कूलमध्ये योगदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्रीनिवास नारखेडे, चेअरमन पी. व्ही. पाटील, मुख्याध्यापिका कोमल कुलकर्णी उपस्थित होत्या. शिक्षिका इंदिरा पाटील यांनी विद्यार्थ्यांना ताडासन, वृक्षासन, भद्रासन, दंडासन, अर्घचक्रासन, वज्रासन, शशांकासन, त्रिकोणासन, भ्रामरी, प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम यांचे प्रात्याक्षिक करुन दाखवले. यासवेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी योगासने केली.
गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय
भुसावळ- हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा झाला. योग शिक्षक डी. के. सोनी, संध्या सोनी यांनी प्रात्याक्षिके दिली. योगासनाचे फायदे, महत्व सांगितले. वृक्षासन, ताडासन, पद्मासन, वज्रासन, अनुलोम, विलोम, कपाल भाती, शलभासन, भुजंगासन, हास्य योगाचे प्रकार व मेडीटेशन यांचे महत्व विषद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश जोशी यांनी सहकार्य केले.
यावल महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन
यावल- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील क्रीडा संचालक प्रा. सुभाष वानखडे यांनी शरीर संवर्धनासाठी योगाचे महत्त्व स्पष्ट केले. योगापासून मिळणारे शारीरिक व मानसिक लाभ या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी विविध आसनांचे फायदे सांगितले. दयाराम गायकवाड या एस.वाय.बी.ए.च्या विद्यार्थ्याने विविध आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले. प्राचार्य डॉ.एफ.एन.महाजन यांनी याप्रसंगी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक रासेयो प्रमुख डॉ.पी.व्ही.पावरा यांनी केले. प्रा.डॉ.सुधा खराटे यांनी आभार मानले.
पोदार इंटरनॅशनल स्कूल
भुसावळ- पोदार इंटरनेशनल स्कूल व पोदार जम्बो किड्समध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा झाला. शाळेच्या पटांगणावर नर्सरी ते के.जी.2, इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी पद्मासन, वज्रासन, शलभासन, भुजंगासन,नौकासन, ओंकारजाप आणि सूर्यनमस्कार केले. योगासनाचे महत्व शाळेचे प्राचार्य विनयकुमार उपाध्याय यांनी सांगितले. योग शिक्षक जितेंद्र लोखंडे व कल्याणी मिस यांच्या मार्गदर्शनाखाली रंजना उपाध्याय यांनी विविध आसनांची आदर्श स्थिती व फायदे सांगितले. सूर्यनमस्काराचे श्लोक म्हणून विद्यार्थांमध्ये उर्जा निर्माण करण्यात आली. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी सुद्धा स्वस्त, सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी योगासन केले. पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका मनीषा शृंगी यांनीही आपली उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील व्यवस्थापक रामदास कुलकर्णी, सीमा पाटील, नीलम अग्रवाल, एस्तर वेन्सेंट, रेखा मुळे, वंदना नाईक, प्रकाश दलाल तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.