लखनऊ। उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील मैनपुर कोट गावातील एका दलित वस्तीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौर्यापूर्वी साबण, शाम्पू वाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौर्याआधी काही प्रशासकीय अधिकार्यांनी या दलित वस्तीला भेट दिली आणि अजब आदेश दिला. अधिकार्यांनी तेथील लोकांना सांगितले की, जर तुम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचे असले तर, अंघोळ करूनच या. 25 मे रोजी योगी आदित्यनाथ या परिसरातून एन्सेफलाईटिसच्या लसीकरण अभियानाची सुरुवात करणार होते.
मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा सुरू होण्यापूर्वी योगी प्रशासनातील काही अधिकारी येथे पोहोचले. त्यांनी संपूर्ण वस्तीमध्ये साबण, शाम्पू आणि सेंटचे वाटप केले. तसेच, सर्वांनी स्वच्छ अंघोळ करून सेंट, पावडर लाऊनच कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे सांगितले. दलित वस्तीमधील एका ज्येष्ठ नागरिकाने प्रसारमाध्यमाला दिलेल्या माहितीनुसार अधिकार्यांनी येथील नागरिकांना सुगंधी साबण, शाम्पू, आणि सेंट वाटले. तसेच, मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी अगोदर याचा वापर करा आणि सुगंधी सेंट, पावडरच लाऊन या, असा आदेशच दिल्याचे या ज्येष्ठ नागरिकाने म्हटले आहे. अधिकार्यांचा प्रताप केवळ साबण, सेंट, पावडर वाटप करच थांबला नाही. तर, अधिकार्यांनी गावकर्यांना आपले अंगण, घर आणि परिसरही स्वच्छ करण्यास सांगितले. दरम्यान, जिल्हा प्रशासन अधिकार्यांनी या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले असून, मौन बाळगले आहे. याच वस्तीतील दुसर्या एका व्यक्तिने सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या दौर्यापूर्वी येथे रस्ते स्वच्छ करण्यात आले. तसेच, नवी शौचालयेही बांधण्यात आले. विजेच्या खांबांवर नवे बल्ब लावण्यात आले. यापूर्वीही मुख्यमंत्री अशाच एका प्रकारामुळे चर्चेत आले होते. देवरिया जिल्ह्यातील बीएसएफ शहीद जवानाच्या घरी योगींचा दौरा होता. तर, त्यापूर्वी अधिकार्यांनी त्या जवानाच्या घरी सोफा, एसी आणि कारपेट लावले होते. तसेच, योगींचा दौरा संपताच तो सर्व लवाजमा हटविण्यात आला होता. त्यामुळेही योगी आदित्यनाथ चर्चेत आले होते.