नवी दिल्ली । आपल्यावरील कामाचा ताण कमी करण्याच्या इराद्याने 85 वर्षीय ई श्रीधरन यांनी गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यांनी लखनऊ आणि कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या सल्लागाराच्या भूमिकेतून आपल्याला मोकळे करण्याची मागणी केली होती. पण झाले उलटंच, राजीनामा घेणे दूरच योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर आणखी कामाची जबाबदारी सोपवली. मी तुमचा राजीनामा घेऊ शकत नाही. उलट तुम्हाला वाराणसी, आग्रा, मेरठ आणि गोरखपूर येथील जबाबदारी देण्यात आल्याचे सांगून परत धाडले. कोची येथे परतल्यानंतर डीएमआरसी कार्यालयात श्रीधरन यांनीच याची माहिती दिली.श्रीधरन अनेक वर्षांपासून मेट्रोसाठी काम करत आहेत. त्यांना मेट्रो मॅन म्हणूनच ओळखले जाते. श्रीधरन म्हणाले, गोरखपूर, आग्रा आणि मेरठ येथे मेट्रोसाठी सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. लखनऊ येथे 10.5 किमी पहिला टप्प्यातील मेट्रो तयार आहे.