मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देणार्या एका व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. कामरान अमीन असे या आरोपीचे नाव आहे. रविवारी कोर्टासमोर सादर करण्यात आल्यानंतर कामरानला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
कामरानने उत्तर प्रदेश सरकारच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कवर फोन करुन, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बॉम्ब हल्ल्यात मारणार आहे अशी धमकी दिली. यानंतर स्थानिक अधिकार्यांनी लखनऊ मधील गोमती नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने तपास केला असता ज्या मोबाईल नंबरवरुन धमकीचा फोन करण्यात आला तो मुंबईतला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या अधिकार्यांना याविषयी माहिती देण्यात आली.
धमकीचा फोन केल्यानंतर कामरानने आपला मोबाईल बंद ठेवला होता. मात्र तांत्रिक सहाय्याच्या आधारावर पोलिसांनी हा फोन मुंबईच्या चुनाभट्टी भागात शेवटचा स्विच ऑन केला गेला होता हे शोधून काढले. यानंतर एटीएसच्या अधिकार्यांनी चुनाभट्टी परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात तपास केला असता, कामरान अमिनचे नाव समोर आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कामरानला अटक केली.