योगी आदित्यनाथांच्या गोरखपूर मठाचा कारभारीच मुस्लिम

0

लखनौ : उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथून पाचवेळा लोकसभेत निवडून आलेले योगी आदित्यनाथ कडवे हिंदूत्ववादी मानले जातात. आता त्यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने मुस्लिमांना धडकी भरलीय, असाही प्रचार जोरात सुरू आहे. पण गोरखपूर येथील मुस्लिमांवर विश्वास ठेवायचा तर आदित्यनाथ हे अत्यंत धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहेत. किंबहूना त्यांच्या मठाचा प्रमुख कारभारीच मुस्लिम असल्याचे उजेडात आले आहे. यासिन अन्सारी असे या कारभार्‍याचे नाव असून, त्यानेच आदित्यनाथ यांच्या उदारतेची साक्ष दिलेली आहे.

गेली ३५ वर्षे यासिन हा गोरखपूर येथील सदरहू मठाचा प्रमुख कारभारी असून, त्या मंदिरात होणार्‍या सर्व दुरूस्त्या व बांधकामाची जबाबदारी संभाळतो आहे. आदित्यनाथ यांच्या व्यक्तीगत दालनात प्रवेश असलेल्या मोजक्या लोकांमध्ये यासिनचा समावेश असून, गोरखपूरच्या बाहेर योगी असतात, तेव्हा तिथल्या व्यवस्थेची संपुर्ण जबाबदारी यासिनची असते. योगी त्यालाच फ़ोन करून माहिती घेतात व आदेश देत असतात. आपल्या प्रदिर्घ कारकिर्दीत छोट्या महाराजांनी कधीही धार्मिक भेदभाव केला नाही, अशी ग्वाही यासिन देतो. अर्थातच तसा तो एकटाच मुस्लिम नाही.

गोरखनाथ मंदिराचा परिसर व शहरात कुठेही मुस्लिमांशी भेदभाव केला जात नाही, अशी खात्री त्या परिसरात व्यवसाय करणारे अनेक मुस्लिम दुकानदार व व्यापारी देतात. मंदिराच्या आवारातही मुस्लिमांची दुकाने असून, त्यांना हटवण्याचाही प्रयास कधी झालेला नाही. मंदिरातील स्वैपाकघराची जबाबदारी मुस्लिम महिलेने संभाळलेली आहे आणि योगींच्या आधीपासून इथे हिंदू मुस्लिम सौहार्द कायम आहे. त्याला आदित्यनाथांनी तडा जाऊ दिलेला नाही, असे महंमद मुत्तकीन याने सांगितले आहे. गोरक्षा हा योगींचा आवडता विषय असून, आवारातील गोशाळेची जबाबदारी मान महंमद या मुस्लिमावर टाकलेली आहे. अशीच साक्ष शेकडो मुस्लिम देतात.