शांतनु गुप्ता : पाचव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टीव्हलमध्ये मुलाखत
पुणे । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकसभेतील कारकीर्द, कामकाजातील विविध विषयातील चर्चेतील सहभाग आणि त्यांचे कार्य बघता राजकारणातील कट्टर हिंदुत्वादी ही त्यांची प्रतिमा चुकीची असल्याचे मत योगी आदित्यनाथ यांच्या जीवन चरित्रावरील ‘द मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकाचे लेखक शांतनु गुप्ता यांनी व्यक्त केले. पुण्यातील यशदा येथे आयोजित पाचव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टीव्हलमध्ये लेखक शेफाली वैद्य यांनी गुप्ता यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते.
तरुणांनी राजकारणात यावे असे आपण नेहेमी म्हणतो. योगी आदित्यनाथ हे ४४ वर्षांचे तरुण मुख्यमंत्री आहेत. त्यांचा लोकसभेतील अनुभव २० वर्षांचा आहे. त्यांनी विविध विषयांवर चर्चेत सहभाग घेतला आहे. त्यांची उपस्थिती, प्रश्न विचारणे हे राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट आहे. गेल्या ३ वर्षात त्यांनी मानव विकास निर्देशांक, युपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न, पिक विमा, सौर उर्जा, भारत-चीन संबंध विविध विषयांवरचे सुमारे ३०० प्रश्न विचारले आहेत. त्यांनी विचारलेले प्रश्न हे ९५ टक्के हे विविध समस्या आणि विकासाच्या बाबतीतले आहेत. तर ५ टक्के हे सांस्कृतिक विषयातील आहेत. त्यामुळे त्यांची राजकारणातील कट्टर हिंदुत्ववादी ही प्रतिमा जी तयार केली आहे ती चुकीची आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.
‘जादू की चिठ्ठी’
भाजपाचा इतिहास बघता लोकप्रिय आणि क्षमता असलेल्या व्यक्तीला हा पक्ष सर्वोच्च पदाचा मान देते. लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान मोदी यांच्या उदाहरणावरून हे लक्षात येते, असे गुप्ता यांनी सांगितले. इतर नेते असताना योगी आदित्यनाथ यांनाच मुख्यमंत्री का केले हे यावरून आपल्या लक्षात येते. त्यांच्या लोकप्रियतेचे दाखले देताना ते म्हणाले, त्यांच्या मठामध्ये जनता दरबार पूर्वीपासून भरला जातो.
उत्तर प्रदेशात नेताजींचे (मुलायमसिंग) यांचे सरकार असो वा बहनजींचे (मायावती) योगी आदित्यनाथ यांच्या चिठ्ठीने कामे होतात, ही सर्वसामान्य लोकांची भावना आहे. त्यांच्याकडे कोणी टेंडर पास करण्यासाठी जात नाहीत तर पेन्शन, शेती अशा प्रश्नांसंदर्भात लोक जातात. त्यांच्या चिठ्ठीने त्यांची कामे होतात म्हणून लोक त्याला ‘जादू की चिठ्ठी’ असे म्हणतात, असे गुप्त यांनी सांगितले. त्यांच्या मठामध्ये २२ संस्था आहेत आणि ५५ हजार विद्यार्थी आहेत. या दृष्टीने योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिले जावे, अशी अपेक्षा गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केली.