योगी आदित्यनाथ यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही – गुलाम नबी आझाद

0

औरंगाबाद | उत्तरप्रदेशात मुख्यमंत्र्यांच्या गावातच ६० बालकांचा मृत्यू झालाय. ते योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशातील कोट्यवधी बालकांची सुरक्षा काय करणार? असा सवाल गुलाम नबी आझाद यांनी औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत विचारला. योगी आदित्यनाथ यांना एक क्षणही पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे आझाद म्हणाले.

ऑक्सिजन पुरवठा बंद केल्यानेच गोरखपूर येथील घटनेत ६० मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा गुलाम नबी आझाद यांनी केला. ते म्हणाले, मी आरोग्यमंत्री असताना मी व माझ्या अधिकाऱ्यांनी सर्वात जास्त वेळी भेटी दिल्या आणि सर्वात जास्त निधी दिला. मी आरोग्यमंत्री असताना केलेल्या उपाययोजनामुळे बालमृत्यूचा आकडा प्रतिवर्ष ३००० वरून १५० पर्यंत खाली आला.

भाजपला लोकांच्या सुरक्षेपेक्षा आपला अजेंडा लादण्यात जास्त रस आहे, अशी टीकाही आझाद यांनी केली. दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याची घोषणा मोदींनी केली होती आतापर्यंत साडेतीन वर्षात साडेतीन लाख नोक-या ही मिळाल्या नाहीत. मोदींनी देशतल्या युवकांची फसवणूक केली आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के अधिक हमीभाव देण्याची घोषणा केली होती व अद्याप दिला नाही शेतक-यांची फसवणूक केली. फोडा आणि राज्य करा या अजेंड्यानुसार भाजप सरकार काम करीत आहे, असे सांगून गुलाम नबी आझाद म्हणाले की, देशात अनेक वर्ग असुरक्षित आहे, प्रसार माध्यम अधिक असुरक्षित, मुली देखील असुरक्षित, अल्पसंख्याक, शेतकरी आणि युवक देखील असुरक्षित आहेत.