योगेश्वरी बचत गटाच्या कारखान्यावर छापा!

0

उस्मानाबाद । नियमानूसार मान्यता न घेताच बालकांसह मातांसाठी पोषण आहार तयार केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाल्याने वरीष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार योगश्‍वरी महिला बचत गटाच्या कारखान्यावर महिला व बालविकास विभागाकडून छापा मारण्यात आला आहे. या कारवाईत पुढील महिन्याची उत्पादन तारीख टाकलेली पोषण आहाराची 130 पोते जप्त करण्यात आले. तर दुसरीकडे अन्न व औषण प्रशासनानेही याच कारणावरून संबंधित बचत गटाला 45 हजार रूपयांचा दंड केला आहे.

अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांसोबतच गरोदर तसेच स्तनदा मातांना पोषण आहार पुरविला जातो. सदरील पोषण आहाराच्या माध्यमातून बालकांसह मातांचे उत्तम पोषण व्हावे, हा उद्देश आहे. परंतु, पोषण आहाराच्या दर्जाबाबत होणार्‍या तक्रारी लक्षात घेता, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. तक्रारी होऊनही प्रशासन कठोर कारवाई का करीत नाही, असा सवालही आता उपस्थित होऊ लागला आहे.

तक्रारीची गंभीर दखल घेत केली कारवाई
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार महिला व बालकविकास विभागाने सोमवारी रात्री केलेल्या कारवाईमुळे तर उपरोक्त तक्रारींना पुष्टी मिळते. उस्मानाबाद शहरापासून काही अंतरावर असलेल्या शिंगोली येथील बालकांना पोषण आहार दिला जातो. सदरील आहाराच्या दर्जाबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारीही झाल्या. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार महिला व बालविकास विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब चकोर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी रात्री बचत गटाच्या कारखान्यावर छापा मारला. तेव्हा तेथे तयार करण्यात आलेला माल पुढील महिन्याची उत्पादन तारीख टाकून पॅक करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. यामुळे येथील 130 पोती जप्त करण्यात आली आहेत.