योगेश गोरे खूनप्रकरणी सर्वतोपरी मदत करणार

0

माथेरान । योगेश गोरे याची 14 नोव्हेंबर 2017 रोजी सातारा हायवे रस्त्यावर किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आली होती. मात्र, योगेशच्या हत्या प्रकरणातील आरोपी गाडीचा चालक राजेश विठ्ठल जाधव, रामचंद्र मोरे, व विजया मोरेसर्व राहणार अमनापूर, तालुका पलूस जि. सांगली यांना अद्याप अटक झाली नाही व त्यांच्याविरोधात तीन महिने उलटूनदेखील चार्जशीट भुईंज पोलीस स्टेशन जिल्हा सातारा यांनी दाखल केली नाही सध्या तिन्ही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन दिला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कै. योगेश कोंडिबा गोरे व त्याचा मित्र अक्षय प्रमोद परब रा. माथेरान हे 14 नोव्हेंबर रोजी योगेशची बहीण संजना ढेबे रा. महाबळेश्‍वर हिच्याकडे मोटारसायकलवरून जात असतानाच सातारा रोडवरील खंबाटकी घाटाजवळ उडतरे गाव वाई जि. सातारा या गावाच्या हद्दीजवळच एम. एच.10 सी.एन.9813 या गाडीला योगेशची मोटारसायकल साधारण खरसटली असता त्या गाडीतील गाडीचे मालक रामचंद्र शांताराम मोरे व विजया रामचंद्र मोरे व चालक राजेश विठ्ठल जाधव रा. अमनापूर तालुका पलूस जि. सांगली यांनी योगेश कडे गाडीच्या साधारण नुकसानभरपाई म्हणून दहा हजार रुपयांची मागणी केली होती.

योगेशच्या आरोपींना सजा झालीच पाहिजे
त्यावेळेस योगेश यांच्याकडे केवळ चार हजार रुपये असल्याने त्याने तुमच्या गाडीची डागडुजी जवळच्याच गॅरेजमधून करून देतो, असे सांगितले. त्यावर संबंधित व्यक्तींनी मान्य करून योगेश याला त्यांच्या गाडीत बसवून जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावर घेऊन गेले. त्यानंतर त्यांच्या मागे योगेशचा मित्र अक्षय गेला असता तेथील उडतारे या गावाच्या हद्दीत योगेश रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला. तेव्हा त्याला स्थानिकांच्या मदतीने सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहीतून नेण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 15 नोव्हेंबर 2017 रोजी योगेश यास डॉक्टर यांनी मयत घोषित केले. या संपूर्ण घटना क्रमाचा तपशील पाहता याप्रकरणी योगेशच्या आरोपींना सजा झालीच पाहिजे यासाठी 25 रोजी स्थानिक आमदार सुरेशभाऊ लाड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मयत योगेशचा भाऊ अविनाश, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, मुकुंद रांजाणे, धनगर समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश बर्गे, चैतन्य शिंदे उपस्थित होते.