कर्वेनगर । मेंदू सक्षम ठेवण्यासाठी आहार सकस व संतुलित ठेवावा. त्यामुळे मेंदूच्या सर्व पेशींना आवश्यक जीवनसत्त्वे, क्षार व महत्त्वाचे घटक मिळतात. विविध तृणधान्ये, मोड आलेली कडधान्ये, सर्वभाज्या, कोशिंबिरी, दूध, ऋतुमानाप्रमाणे फलाहार यामुळे शारीरिक, मानसिक स्थिती चांगली राहते. योग्य आहार-विहारामुळे डिमेन्शिया, अल्झायमरसारख्या आजारांना आपण नियंत्रित ठेवू शकतो, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमर शिंदे यांनी व्यक्त केले.
जागृती पुनर्वसन केंद्रातर्फे जागतिक अल्झायमर दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमात डिमेन्शिया आजारा विषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
डॉ. शिंदे म्हणाले, मद्यपान, धुम्रपान तर मेंदूसाठी कटाक्षाने टाळावे. नियमित व्यायाम करावा. वर्तमानपत्रातील कोडी नियमित सोडवावी. डिमेन्शिया, अल्झायमर यांच्यासारख्या आजाराबाबत आपल्याकडे फारशी जागृती नाही. साठीनंतर मेंदूच्या कार्याचा हळूहळू र्हास होत जातो. यात प्रामुख्याने मेंदूची महत्त्वाची कार्ये स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, हातापायाची हालचाल, रोजची कामे याचा विसर पडत जाणे, या सर्व गोष्टी हळूहळू वाढत जातात. निर्णयक्षमता कमी-कमी होणे, पुढील काळात तर पेशंट स्वत:लाही ओळखत नाही. कुठे विशिष्ट ठिकाणी जायला निघाल्यास आपणाला कुठे जायचे याचा विसर पडून रस्त्यातच उभा राहतो. ही स्टेज म्हणजे अल्झायमर होय. या आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठी, स्मृतिभ्रंशाचे निदान करण्यासाठी विविध तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये बुद्धीचे मापन करण्याची विविध प्रश्नावली वैद्यकीय साहित्यात उपलब्ध असते.