तळेगाव (प्रतिनिधी) – वस्तू व सेवा कराची मध्यमवर्गीयांना मोठी झळ बसली आहे. नोटबंदी, मेक इन इंडिया आणि वस्तू व सेवा कर ही धोरणे यथायोग्य नियोजन न केल्यामुळे सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहेत, असा सूर इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित ‘वस्तू व सेवा कर’ विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात उमटला. इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘वस्तू व सेवा कर’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात राज्य व राज्याबाहेरील महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व तज्ज्ञ मार्गदर्शक, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
डॉ. वैशाली पाटील यांचा सत्कार
डॉ. बी. वाय. देशमुख, डॉ. ए. पी. बर्वे, डॉ. एस. एन. नले, एच.पी. शिंदे, डॉ. प्रताप फलफले, डॉ. एस.के. ढगे, डॉ. संजीव लाटे, डॉ. एस. व्ही. शिंदे, डॉ. अशोक पगारिया आदी तज्ज्ञांची व्याख्याने झाली. चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थविश्लेषक डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी. डी. बाळसराफ यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. चर्चासत्राचा समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. मलघे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर निवड झाल्याबद्दल डॉ. वैशाली पाटील आणि डॉ. एस. के. ढगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
…तर भारत महासत्ता बनेल!
भारतीय अर्थव्यवस्था सेवाप्रदान अर्थव्यवस्था आहे. देशांर्तगत मालाला वाढत जाणार्या मागणीमुळे येत्या काही काळात भारतीय अर्थव्यवस्था चीनच्या अर्थव्यवस्थेला मागे सारून जगातली एकमेव मोठी बाजारपेठ निर्माण होईल. यामध्ये भारतीय करप्रणालीची भूमिका महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने त्यात अमुलाग्र बदल होणे क्रमप्राप्त आहे आणि जीएसटी त्या दृष्टीने भारत सरकारने उचललेले एक क्रांतिकारक पाऊल आहे. त्यामुळे भारत एक महासत्ता बनेल, यात तिळमात्रही शंका नाही, असे डॉ. अभय टिळक यांनी यावेळी सांगितले.
जीएसटीची गरीबांना झळ
सरकारने पुर्वनियोजन न करता जीएसटीची अमंलबजावणी केल्यामुळे अर्थव्यवस्थेतील गरीब, सर्वसामान्य लोकांना मोठी झळ बसली आहे. मेक इन इंडिया, नोटबंदी ही धोरणे ज्या उद्देशाने राबवली, ती उद्दिष्टे साध्य झाली नाहीत. यातून मात्र सरकारची झोळी भरली गेली. याउलट यात सर्वसामान्य मध्यमवर्गीय भरडला गेला व जात आहे, असे डॉ. एस. के. ढगे यांनी सांगितले. संजीव लाटे यांनी, ग्राहकांना तसेच उपभोक्त्यांच्या दृष्टीकोनातून ही करप्रणाली फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. सरकारने वस्तू व सेवा कराची योग्य अंमलबजावणी केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेत अनुकूल बदल घडून येतील, असे डॉ. प्रताप फलफले यांनी सांगितले.