शहादा । शेतकर्यांच्या भाजीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शहादा-खेतीया रस्त्यावर काही शेतकरी वांगे रस्त्यावर फेकत असल्याचे चित्र दिसत आहे. शहादा – खेतीया या महामार्गावर दुपारी 11वा.च्या सुमारास बाजार पेठेत योग्य भाव मिळाला नाही म्हणून परतीचा मार्ग धरणारा शेतकरी वैतागून आपल्या गाडीतील वांगे खुलेआम रस्त्यावर फेकून दिल्याने परीसरातील काही शेतकरी व येणारे जाणारे वाहनधारक वाहन थांबवुन सदर चित्र पहात होते.
उत्पादन जास्त आणि खप कमी : कमी वेळात जास्त उत्पादन देणारे नगदी पिक म्हणून शेतकरी दरवर्षी वांग्याची लागवड करतात. परंतु यावर्षी उत्पादन जास्त आणि खप कमी झाल्याने वांग्याचे भाव कमी आहेत.वांगे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. वांग्याच्या शेतीला मशागती पासुन आलेला खर्च आणि पडलेला भाव यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. मुसळधार पावसामुळे या पिकाच्या नुकसानित अधिकच भर पडली.बाजारात वांगी 5 ते 10 रुपये दराने मिळतात. मात्र कच्च्या मालाच्या आणि भाजीपाल्याच्या भावावर शेतकरी अथवा शासनाचे नियंत्रण नाही.
वरूणराजाची वारंवार दांडी
वरूणराजाची होणारी वारंवार दांडी तसेच शेतीमालाला खर्च वजा जाता योग्य भाव मिळत नसल्याने असे प्रकार घडत आहे.तसेच पावसाळ्यात पावसाळी वांग्याची खुप काळजी घ्यावी लागते निम्मे वांगे खराब होत असल्याने व बाजारपेठेतही सध्या वांग्याना मागणी कमी असल्याने शहादा भाजीमार्केट मध्ये मध्यप्रदेशातुन मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विक्रीसाठी शहादा येथे येतात. परंतु भाजीपालाला भाव मिळत नसल्याने खर्च जाता हातात काहिच रहात नाही म्हणून शेवटी वैतागून काही शेतकरी वांगे रस्त्यावर फेकत असल्याचे दिसून आले.