योग्य वेळी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी : दत्ता साने

0

सत्ताधार्‍यांच्या चांगल्या कामांना पाठिंबा देणार

पिंपरी : आगामी निवडणुका लक्षात घेऊन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे यापुढे पक्षाने दिलेली जबाबदारी चोख पध्दतीने पार पाडण्यासोबतच भ्रष्टाचार करणार्‍यांची गय केली जाणार नाही. पुराव्याशिवाय कोणावरही शिंतोडे उडवणार नाही. 2017-18 च्या अर्थसंकल्प कुठे आणि किती खर्ची केला याचा हिशोब घेणार आहोत. सत्ताधार्‍यांनी वर्षभर केलेल्या कामकाजाची माहिती घेऊन चांगल्या कामाला पाठिंबा आणि चुकीच्या कामांना विरोध करणार असल्याचे नगरसेवक आणि नवनियुक्त विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सांगितले.

आक्रमक स्वभावामुळेच पक्षनेते पद
महापालिकेमध्ये आजवर अनेक आंदोलन आणि विविध विषयांतून दत्ता साने यांचे नाव चर्चेत होते. आक्रमक स्वभावामुळे विरोधी पक्षनेते पद त्यांना दिले असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी विरोधात असलेल्या पक्षनेत्यांनी काही विषयांवर बोलणे अपेक्षित असताना, सत्ताधार्‍यांना विरोध केला नाही, यावरून माजी आमदार विलास लांडे यांनी विरोधी पक्षनेते बदलण्याची मागणी केली होती. त्यानुसार पक्षाने विरोधी पक्षनेतेपदाची धुरा साने यांच्याकडे सोपविली आहे.

आपली पोळी भाजून घेत आहेत
साने पुढे असेही म्हणाले की, राष्ट्रवादीला मूर्ती घोटळ्यावरून बदनाम करणार्‍या सत्ताधार्‍यांनी वर्षभर काय केले आहे. पारदर्शक कारभाराच्या नावावर आपली पोळी भाजून घेतली जात आहे. पक्षश्रेष्ठींनी योग्य वेळी आपल्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली असून, ती योग्य रित्या पार पाडणार आहे. आपण कुणाच्याही रूपयामध्ये मिंदा नाही आणि यापुढेही असणार नाही.

यापूर्वी महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक हे फक्त विशेष सर्वसाधारण सभेपुरतेच हजेरी लावत होते. मात्र यापुढे सातत्याने नगरसेवकांची महापालिकेत उपस्थिती असणार आहे. एकविचाराने काम करण्यासाठीचा प्रयत्न असणार आहे. नगरसेवकांनाही एकप्रकारा पक्षाची शिस्त लागणार आहे. भोसरी परिसरातील जाधववाडी, चिखली, कुदळवाडी, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती अशा अनेक परिसरांमध्ये साने यांना माननारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊनच त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली असल्याचे बोलले जात आहे.