योग जीवनाला परिपूर्ण करते : मरिएला क्रुझ

0

धुळे । योग ही एक साधना आहे. त्यामुळे नवीन जीवनाला सुरुवात होवून आपले जीवन परिपूर्ण होते. योगामुळे मनाला शांती मिळते, असे प्रतिपादन अमेरिकेतील कोस्टारिका या प्रजासत्ताक देशाच्या भारतातील राजदूत मरिएला क्रुझ यांनी केले. मरिएला कु्रझ या दोन दिवसीय धुळे दौर्‍यावर असून, त्यांनी एसएसव्हीपीएस विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन आ. कुणाल पाटील, अश्‍विनी पाटील, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.पी. पाटील आदी उपस्थित होते.

भारतातच मिळाली शांती
योगाशिवाय अजून कोणत्या गोष्टीतून शांती मिळू शकते, असे त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, मानवी स्वभावाला ज्या गोष्टीतून मनस्वी आनंद मिळतो, त्यातूनही शांती मिळत असते. योगासाठी काही विशिष्ट आहाराची गरज आहे का? असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, आपल्या मनाला जे पटते खावे. दुसरा खातो म्हणून आपणही तेच खावू नये. आपल्या शरिराला जे पचते तोच आहार घेणे गरजेचे आहे. कोस्टारिया या देशात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे असल्यास, इंग्रजी व स्पॅनिश भाषा येणे गरजेची आहे. तुम्ही इथे योगाचे धडे घेऊन तेथे आल्यास, तुम्हालाही चांगली संधी मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले. पुढे बोलतांना मरिएला क्रुझ म्हणाल्या की, मी जगात अनेक देश फिरले, मात्र मला शांती फक्त भारतातच मिळाली. येथे चांगले गुरू मिळाले. याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. सूत्रसंचालन एम. नंदिनी यांनी केले. यावेळी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.व्ही. पाटील, वैभव सबनीस आदी उपस्थित होते.