नंदुरबार । केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येणार्या केंद्र पुरस्कृत योजनांची कामे तत्काळ पूर्ण करावीत अशा सूचना खासदार डॉ. हिना गावीत यांनी आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठक घेण्यात आली. त्यावेळी खासदार डॉ. हिना गावीत बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, समितीचे अशासकीय सदस्य डॉ. कांतीलाल टाटीया, सविता जयस्वाल, नारायण सामुद्रे, बळीराम पाडवी, शहादा, अक्कलकुवा, पंचायत समिती सभापती,व विविध अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
अधिकार्यांनी समन्वय ठेवून योजना पूर्ण करावी
जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागामार्फत राबविल्या जाणार्या योजना जिल्ह्यात राबवितांना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व अधिकार्यांनी आपापसात समन्वय ठेवून योजना वेळेत पूर्ण कराव्यात, अशा सूचना दिल्यात. समिती सदस्य डॉ. कांतीलाल टाटीया यांनी जिल्हा समन्वय व सनियंत्रण समितीच्या कार्यकक्षेत येणार्या योजनांच्या विषयांवर विविध मुद्दे उपस्थित करुन त्यावर संबंधित विभागाने काय कारवाई केली याबाबत माहिती घेतली.
प्रकरणे वेळेत मान्यतेसाठी पाठवा
खासदार डॉ. हिना गावीत यावेळी बोलतांना म्हणाल्या की, जिल्ह्यास विद्युतीकरणासाठी पुरेपुर निधी मिळणार असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व गांवे, वाड्या-पाड्यांवर विद्युतीकरण करण्यासाठी संबधित विभागाने अचूक आराखडा सादर करावा, जिल्ह्यात विद्युतीकरणाची कामे प्राधान्याने करावीत. विद्युतीकरणापासून एकही गांव, वाडा-पाडा वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी. आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी दिनदयाल योजनेमध्ये मिळालेल्या निधीमधून काय-काय कामे केलीत, सिंगल फेज किती, विज कनेक्शने दिलेले जिल्ह्यातील ग्राहक संख्या, किती कनेक्शन देणे बाकी याबाबत संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेतली व कामांची प्रकरणे वेळेत प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावीत अशा सूचनाही संबंधित विभागांना दिल्यात.
विविध योजनांचा घेतला आढावा
या बैठकीत केंद्र पुरस्कुत योजनांचा सन 2018-19 मधील माहे मार्च-2018 अखेर विकास कामांचा आर्थिक व भौतिक आढावा घेण्यात आला. यामध्ये स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना, आदिवासी विभागाकडील योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय सामाजिक अर्थ सहाय्य योजना, राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना, अन्नपूर्णा योजना, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, या योजनावर खासदार डॉ. हिना गावीत यांनी चर्चा करुन आढावा घेतला.