योजनांचे नाव बदलून सरकार श्रेय लाटतेय

0

नंदुरबार । सामान्य माणसांच्या गरजा लक्षात घेऊन आणि विविध प्रकल्प राबवून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार शहराला स्मार्टसिटीत रुपांतरीत केले आहे. राजकारण करण्यासोबतच लोकांना समर्पित काम करण्याचे उदाहरण त्यांनी उभे केले आहे. राज्यातील राजकारण्यांनी एकदा नंदुरबारला येऊन अभ्यासावे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्याची प्रशंसा केली. नगरपालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. नंदुरबार नगरपालिकेने लोकनेते दादासाहेब बटेसिंह रघुवंशी उद्यान, डॉ.ए.पी.जे. कलाम ई-लायब्ररी तसेच आरोग्य सुविधा केंद्र उभारले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला.

नगरपालिकेने राबविलेल्या प्रकल्पांची प्रशंसा
नंदुरबार नगरपालिकेने राबवलेल्या विविध योजना व प्रकल्प यांची प्रशंसा करतांना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, सर्व सामान्य माणसांच्या गरजा लक्षात घेऊन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे साकारली गेली आहेत. त्यामुळे या दुर्गम भागातील नंदुरबार शहराचा चेहरामोहराच बदलून गेला आहे, अशा शब्दात त्यांनी आमदार रघुवंशी यांचे कौतूक केले. तत्पूर्वी आमदार रघुवंशी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, मुंबईपेक्षा नंदुरबारचे रस्ते चांगल्या दर्जाचे बनवण्यात आले आहेत. त्यामुळे मी काय करतो आहे, याचा हिशोब जनतेने लिहून ठेवला आहे. भविष्यात शहरातील जनतेसाठी 40 टक्के सवलतीच्या दराने मोठे औषध विक्री केंद्र उभारणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. 15 ऑगस्टपर्यंत हातोडा पुलाचे उदघाटन झाले नाही तर, आम्ही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन बहूचर्चित हातोडा पुलाचे उदघाटन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप
लोकार्पण सोहळ्यानंतर शिवाजी नाट्य मंदिर शेजारी उभारलेल्या भव्य मंडपाचे उदघाटन आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, काँग्रेसने ज्या योजना साकारल्या होत्या, त्या योजनांचे नाव बदलून भाजपसरकार खेळ करीत आहे. फक्त घोषणा देऊन लोकांची दिशाभूल केली जात असल्याने या सरकारच्या काळात सामाजिक व्यवस्थाच बिघडून गेली आहे असा आरोप केला. समाजा-समाजात दुही निर्माण करून सामाजिक विषमतेला खत पाणी घातले जात आहे. म्हणून नागरिकांनी आता जागरूक राहून या सरकारच्या ध्येयधोरणांविरुध्द पेटून उठले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित, आमदार सुरुपसिंग नाईक, आमदार कुणाल पाटील, आमदार के.सी.पाडवी, आमदार काशिराम पावरा, माजी मंत्री पदमाकर वळवी, आमदार डी.एस. अहिरे, माजी सॉलिसिटर अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी, नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, जि.प.अध्यक्षा रजनीताई नाईक, सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, तळोद्याचे गटनेते भरत माळी यांच्यासह धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.