योजना बंद करण्याचा निर्णय चुकीचा!

0

पुणे । अंध, अपंग गरीब आणि निराधार महिलांसाठी असणार्‍या महापालिकेच्या योजना सत्ताधारी भाजपने गुंडाळल्या आहेत आणि त्या निर्णयाला गरिबांचा पक्ष म्हणविणार्‍या काँग्रेसने ही पाठिंबा दिल्याने लोकांमध्ये संताप आहे. आम आदमी पार्टीने हा विषय हाती घेतला असून येत्या सोमवारी या पक्षाचे प्रतिनिधी महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत. योजनाच बंद करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि गरजूंची फसवणूक करणारा असल्याची प्रतिक्रिया उमटत असून दोन वर्षे या योजनांसाठी असलेला निधी पालिकेने कुठे वापरला याचेही गौडबंगाल आहे. त्यामुळे या योजनांचा फेरविचार करावा असे आवाहन आम आदमी पार्टी यानिमित्ताने करणार आहे.

महापालिकेच्यावतीने माता रमाई निराधार महिला योजना, बाबा आमटे विकलांग योजना, राजमाता जिजाऊ स्वाभिमान योजना, शरद स्वाभिमान योजना अशा चार योजना राबविल्या जातात. राजकीय पक्षांनीच गाजावाजा करून या योजना सुरू केल्या. त्याकरिता अंदाजपत्रकात तरतुदी केल्या. भाजपने सत्तेवर येताच या योजना संपविण्याचा पवित्रा घेतला. योजनांसाठी आवश्यक निधीची तरतूद गेल्या काही वर्षांपासून होत नसल्याने योजना बंद केल्याचे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले.

आर्थिक दुर्बलासाठीच्या पाच योजना अस्तित्वात कधी आल्या, त्याकरीता अंदाजपत्रकात तरतूद किती होती आदी तपशील आम आदमी पार्टी जमविणार असून सोमवारी आयुक्त यांचीही भेट घेणार आहेत. या योजना जाहीर करा अशी नागरिकांची मागणी नव्हती, कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात योजनांचे आश्‍वासन दिलेले नव्हते, तरीही राजकीय पक्षांनी योजना अंदाजपत्रकात आणल्या. त्यानंतर गरजू लोकांनी अर्ज केले आता मात्र अर्जदारांची फसगत होणार आहे. गेल्या वर्षभरात योजनेचा लाभ कोणालाच दिलेला नाही असे प्रशासनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

काँग्रेस पक्षाला न शोभणारे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी सत्तेवर असताना या योजनांबाबत नागरिकांशी बनवाबनवी करण्यात आली आणि नव्या सत्ताधार्‍यांनी पाचही योजना गुंडाळून एकदम टोकाचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षात या निर्णयावरून मतभेद आहेत. गरिबांसाठीच्या योजना बंद करणे काँग्रेस पक्षाला शोभणारे नाही, यापेक्षा मर्यादित स्वरूपात योजना चालू ठेवण्यास भाजपला भाग पाडावे असे काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे म्हणणे आहे. या योजना मर्यादित स्वरूपात चालू ठेवून शहरी गरीब योजनेचाही निधी वाढवता येतो, असाही युक्तिवाद करण्यात येत आहे.

शहरी-गरीब योजनेचीही तीच स्थिती
गेली दोन वर्षे या योजनांसाठी असलेला निधी महापालिकेने वापरला कुठे असाही एक प्रश्‍न निर्माण झाला आहे. आम आदमी पार्टीने शहरी गरीब योजनेचाही आढावा घेण्याचे या निमित्ताने ठरविले आहे. चालू आर्थिक वर्षात शहरी-गरीब योजनेतील औषधे महापालिकेच्या दवाखान्यात रुग्णांना मिळाली नव्हती. यातही गरीब वर्गच भरडला गेला होता.

गरजूंची होतेय फसवणूक
योजनाच बंद करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि गरजूंची फसवणूक करणारा आहे, अशी प्रतिक्रिया माजी सभागृह नेते आणि नगरसेवक सुभाष जगताप यांनी जनशक्तिशी बोलताना व्यक्त केली.
योजनेची तरतूद कमी करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा पालिकेच्या मुख्य सभेत मी विरोध केला होता त्यावेळी योजना चालूच ठेवणार असून यासाठीची
तरतूद वाढविणार आहोत असे आश्‍वासन भाजपच्या पदाधिकारी यांनी तेव्हा दिले.
गरिबांची योजना बंद करू नका परमेश्‍वर तुम्हाला माफ करणार नाही, असेही सभागृहात म्हणाल्याचे जगताप यांनी सांगितले.