योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचवा

0

धुळे । राज्यातील शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वंकष कल्याणासाठी राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेत शेतकर्‍यांनी विकास साधावा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या स्क्रोलर्सच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचेल, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा माहिती कार्यालयाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची सविस्तर माहिती देणारे स्क्रोलर्स तयार केले आहेत. या स्क्रोलर्सचे उदघाटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते दोंडाईचा येथे संवाद पर्व कार्यक्रमांतर्गत झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, संजीवनी शिसोदे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

संवाद पर्व उपक्रमाची माहिती
जिल्हा माहिती अधिकारी श्री. राजपूत यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून तयार रण्यात आलेल्या स्क्रोलर्सची सविस्तर माहिती दिली. तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या संवाद पर्व या उपक्रमात आतापर्यंत राबविलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल मंत्री श्री. रावल यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा माहिती कार्यालयाचे कौतुक
मंत्री श्री. रावल म्हणाले, शेतकरी व सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. या घटकांच्या विकासासाठी शासन तत्पर आहे. राज्य शासनाच्या विविध योजना, आदेशांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचून या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनांच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेले स्क्रोलर्स उपयुक्त ठरतील. यामुळे राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचू शकेल. राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना सुमारे 35 हजार कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार असल्याचे श्री. रावल यांनी सांगितले.

स्क्रोलर्स शासयकीय कार्यालयात लावा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा संवाद पर्व हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमांत विविध विभागांनी आपला सहभाग नोंदवीत आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली पाहिजे. जेणेकरुन या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना घेता येईल. शेतकरी, नागरिकांनी या योजनांचा लाभ घेत आपला विकास साधला पाहिजे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे स्क्रोलर्स जिल्ह्यातील तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयात लावावेत, असेही यांनी निर्देश दिले.