धुळे। धुळे शहरासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केले.धुळे शहरासाठी राबविण्यात येत असलेली पाणीपुरवठा योजना, अमृत योजना आणि भूमिगत गटार योजनेचा आढावा महानगरपालिकेच्या सभागृहात मंत्री डॉ. भामरे यांनी बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर कल्पना महाले, उपमहापौर उमेर शव्वाल अन्सारी, स्थायी समितीचे सभापती कैलास चौधरी, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, आयुक्त सुधाकर देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता श्री. सूर्यवंशी यांच्यासह धुळे मनपाचे प्रतिनिधीत्व करणारे सर्वपक्षीय नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.90 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर झाल्याने सदस्यांच्या चेहर्यावर समाधान झळकत होते. मनपा विकासाच्या नव्या वाटेवर जात असल्याचे काहींनी बोलून दाखविले.
90 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर
धुळे शहरातील नागरिकांच्या महानगरपालिकेशी निगडित तक्रारी असतील, तर त्या त्यांनी आपल्या कार्यालयात सादर कराव्यात. या तक्रारींची दखल महानगरपालिकेत होणार्या पुढील आढावा बैठकीत घेण्यात येईल. भूमिगत गटार योजनेसाठी 90 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला आहे. त्यामुळे तत्काळ कार्यवाही सुरू करावी, असेही निर्देश मंत्री डॉ. भामरे यांनी दिले. 14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून महानगरपालिकेस आतापर्यंत 28 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीच्या खर्चाची माहिती सादर करण्याचे निर्देश मंत्री डॉ. भामरे यांनी यावेळी दिले.
तक्रारींचा खुलासा
मंत्री डॉ.भामरे म्हणाले, धुळे शहरात राबविण्यात येणार्या 136 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेविषयी लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारींचा खुलासा व त्यावरील उपायांबाबत महानगरपालिका आयुक्त,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ठेकेदाराने 15 दिवसांच्या आत करावा. याबाबत समाधानकारक खुलासा झाला नाही, तर या योजनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल.संबंधितांनी सूचनांची गांभीर्याने दखल घ्यावी. योजनेची कामे करताना कामाची गुणवत्ता व दर्जा राखला गेला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. 14 व्या वित्त आयोेगाच्या अधीन मिळालेल्या निधीचा योग्य वापराची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नियमितपणे घेणार बैठका
महापौर श्रीमती महाले यांनी सांगितले, महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियमितपणे बैठका घेवून आढावा घेतला जात आहे. ही योजना लवकर कार्यान्वित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असेही सांगितले. यावेळी अनुप अग्रवाल, प्रतिभा चौधरी, फिरोज लाला, हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, सोनल शिंदे, गुलाब माळी आदींनी समस्या मांडल्या. यावेळी लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, मनपाचे प्रतिनिधीत्व करणारे सर्वपक्षीय नगरसेवक,शहरातील जागरुक स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय व्यक्ती यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.