वारली चित्रकाराला भुसावळात अनोखी श्रद्धांजली ; उपक्रमाला उत्स्फूर्त दाद
भुसावळ- राज्यातील वारली चित्रकलेला जागतिक पातळीवर नेणार्या स्व.जिव्या सोमा म्हशे यांना येथील सार्वजनिक वाचनालयात अनेक रंगकर्मी व रसिकांनी श्रद्धांजली वाहिली. सार्वजनिक वाचनालय व आर्टीस्ट व्हीजन फाउंडेशनद्वारे संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी आणि वारली चित्रकार रमाकांत भालेराव यांनी रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी पाचपर्यंत सलग सात तास विविध आकाराच्या बोर्डवर वारली चित्रशैलीतील चौक, तारपा नृत्य, दिंडी आणि आदिवासींच्या दैनंदिन जीवनातील कार्ये काढून आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.
यांची होती उपस्थिती
सुरुवातीला सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत ठाकूर व ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी म्हशे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. आर्टीस्ट व्हीजनचे राजेंद्र जावळे यांनी म्हशे यांच्या कार्याविषयी माहिती दिली. नंतर भालेराव यांनी वारली चित्रकृती काढण्याच्या कार्यास प्रत्यक्ष सुरू केली. यात त्यांनी विविध आकाराच्या बोर्डवर वारली चित्रशैलीतील चौक, तारपा नृत्य, दिंडी आणि आदिवासींच्या दैनंदिन जीवन शैलीतील कार्ये साकारली. यावेळी स्वा.सावरकर राष्ट्रीय संस्थेचे सचिव गणेश वढवेकर, डॉ. नितीन चौधरी, चित्रकार राजपाल शर्मा, रंगकर्मी कल्पना कोल्हे, प्रा. श्रीकांत जोशी, तन्मय जोशी, अवधूत दामोदरे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी शंभू गोडबोले, शुभम कुळकर्णी, चारू भालेराव, उदय जोशी, सार्वजनिक वाचनालयाचे हरीश आदींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन आर्टीस्ट व्हीजन फाउंडेशनचे राजेंद्र जावळे यांनी केले.