रंगपंचमीच्या रंगात रंगणात द्रौपदीसहीत विविध ग्रामदेवतांची सोंगे

0

पनवेल । वाडा तालुक्यातील चांबळे गावात गेली अनेक वर्षापासून रंगपंचमी उत्सव साजरा केला जातो. चांबळे येथील दरवर्षी होणार्‍या रंगपंचमी उत्सवाला व त्यानिमित्ताने स्थानिक कलाकार सादर करीत असणार्‍या नाटकाला शतकाची परंपरा आहे. रंगपंचमी उत्सव व त्यानिमित्ताने सादर केलं जाणार नाटक, ग्राम देवतांची सोंगे ही परंपरा चार-पाच पिढ्यांपासून अखंडपणे सुरू आहे.

यावर्षी देखील आजच्या दिवशी रात्री 9.30 वाजता येलकोट येलकोट जय मल्हार हे तमाशा प्रधान लोकनाट्य सादर होणार आहे. हे नाटक गावातील श्री हनुमान प्रासादीक नवतरूण नाट्य मंडळाच्या कलाकारांनी बसविलेले आहे. या नाटकासाठी व्यावसायिक रंगभूमी डोंबिवली यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. तर शनिवार 18 मार्च रोजी सकाळी 7.30 वा. ग्राम देवतांची सोंगे काढण्यात येणार आहेत. पूर्वी रामायण-महाभारतातील पुराण कथांवर व प्रसंगांवर आधारित दशावतारी नाटके सादर केली जायची. तर त्यानंतर संगीत शाकुंतल, संगीत शारदा, द्रौपदी हरण, संगीत मानापमान यासारखी संगीत नाटके सादर केली जायची.

चांबळे ग्रामस्थांचे वैशिष्ट्य
रंगपंचमीच्या दुसर्‍या दिवशी गावदेवी, वेताळ, वीरभद्र, म्हैसासूर या ग्राम देवतांची सोंगे काढली जातात. यावेळी सादर होणार्‍या म्हैसासूर वधाचे विशेष आकर्षण असते. शतकाची परंपरा असणार्‍या रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने सादर होणारी नाटके व ग्रामदेवतांची ही परंपरा अखंडित सुरू ठेवणे हे चांबळे ग्रामस्थांचे वैशिष्ट्ये आहे.

सणाने गावाला लौकिक मिळवून दिला
60 ते 80 च्या दशकापर्यंतचा कालखंड हा तमाशा प्रधान नाटके-लोकनाट्यांनी गाजला. अत्यंत दर्जेदार व अभिनय संपन्नतेने सादर केल्या जाणार्‍या या नाटकांनी गावाला वेगळा लौकीक मिळवून दिला होता. वारणेचा वाघ, डाकू मानसिंग, बंडखोर, चंबळचा डाकू, येलकोट येलकोट जय मल्हार, फकिरा, रक्तसम्राट, यासारखी नाटके त्याकाळी खूपच गाजली.

आजही सादर होते लोकनाट्य
1980-90 नंतर मात्र सामाजिक नाटके सादर केली जाऊ लागली होती. आजही कधी लोकनाट्य तर कधी सामाजिक नाटके अगदी दरवर्षी सादर केली जातात. आजच्या धावपळीच्या युगातही ही नाट्य परंपरा गावातील तरुणांनी जाणीवपूर्वक जोपासली आहे हे विशेष. रंगपंचमीच्या दुसर्‍या दिवशी गावदेवी, वेताळ, वीरभद्र, म्हैसासूर या ग्राम देवतांची सोंगे काढली जातात.