रंगात आलेल्या जुगारावर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचा छापा : लाखांच्या मुद्देमालासह सहा जाह्यात

चाळीसगाव : तुक्यातील पिंपरखेड शिवारात अवैधरीत्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत सहा जणांकडून 98 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला तर सहा संशयीतांना अटक करण्यात आली.

जुगारींच्या गोटात खळबळ
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड शिवारात रांजणगावाकडे जाणार्‍या शिव रस्त्यालगतच्या एका शेतीच्या शेजारी बेकायदा जुगार अड्डा खेळत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. लागलीच त्यांनी पुढील कारवाईचे आदेश दिल्यानंतर एपीआय धरमसिंग सुंदरडे यांनी आपल्या सहकार्‍यांसह सदर ठिकाणी शनिवार, 7 रोजी दुपारी 3.45 वाजताच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी पत्याचा जुगार खेळताना सहा जण मिळून आले. त्यांच्याकडून रोकडसह मोटारसायकल व पत्याचा साहित्य असा एकूण 98,270 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

या जुगारींवर झाली कारवाई
गणेश गोपाळराव देशमुख (30, घाट रोड, चाळीसगाव), सुमित अंबादास सोनावणे (26 , घाटरोड, चाळीसगाव), जाकीर शेख फारुख (32, नागद रोड, चाळीसगाव), प्रल्हाद दयाराम सूर्यवंशी (35, अहिल्यादेवी नगर चाळीसगाव), राजू हिरालाल कुमावत (29, पाटणादेवी रोड चाळीसगाव), मुकेश रणछोड राठोड (50, हिरापूर, ता.चाळीसगाव) अशी ताब्यात घेतलेल्या जुगारींची नावे आहेत.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धरमसिंग सुंदरडे, नितीन आमोदकर, दिनेश पाटील, भगवान पाटील, .शांताराम पवार, देविदास पाटील, ज्ञानेश्वर बडगुजर यांनी केली. दरम्यान पोना ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात महाराष्ट्र जुगार क्ट कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.