पुणे : केवळ ठराविक लोकांच्या वर्तुळात वावरणारे असा शिक्का बसलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचे स्थानिक पदाधिकार्यांचे मार्ग आता खुले झाले आहेत. कुठलाही स्थानिक पदाधिकारी माझ्याशी थेट संपर्क साधू शकतो, अशी माहिती खुद्द राज ठाकरे यांनी दिली. तसेच, लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्यावरुन पुण्यात सुरु असलेला वाद म्हणजे मूर्खपणा असून, सार्वजनिक गणेशोत्सवात लोकमान्यांचे योगदान विसरता येणार नाही, अशा शब्दांत राज यांनी भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या पदाधिकार्यांना फटकारले.
सप्टेंबरमध्ये मुंबई, पुण्यात मेळावा
पक्षाची नव्याने बांधणी आणि प्रभागनिहाय पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यासाठी राज ठाकरे शुक्रवारपासून पुणे दौर्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. यापुढे कोणताही शाखा अध्यक्षदेखील ई-मेल किंवा मोबाईलद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकतो, असे ते म्हणाले. येत्या सप्टेंबरमध्ये मुंबई आणि पुण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून, त्यावेळी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या मेळाव्यादरम्यान ठाकरे स्वतःचे फेसबुक पेजही लॉन्च करणार आहेत. मनसेची राजकीय भूमिका थेट तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षात खांदेपालटाचे संकेत!
महापुरुषांसोबत देवाचीही विभागणी केली जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सवावरून सुरू झालेला वाद चुकीचा आहे. लोकमान्यांचे योगदान कोणालाही विसरता येणार नाही, असे सांगून राज ठाकरे म्हणाले, कोणताही राजकीय पक्ष घ्या, त्यांचा विकास व्हायला काही वेळ लागला आहे. आमच्याकडे दुसरी फळी नाही असे सांगितले जाते, पण त्याला काही वेळ लागेल. सध्याची स्थिती चांगली नाही. भाजपच्या राजकीय यशामुळे प्रादेशिक पक्षांचे महत्व कमी होत चालले आहे, त्यांचे धोरणही तसेच दिसते यावर बोलताना ठाकरे यांनी येत्या 21 सप्टेंबरला आपण मुंबईत पक्षाचा मेळावा घेणार आहोत, त्यात सर्व गोष्टी विस्ताराने बोलणार आहे असे सांगितले. पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्याकडून शहारातील परिस्थिती जाणून घेत आहे. लवकरच पदाधिकार्यांच्या नेमणुका केल्या जातील आणि त्यात नक्कीच नवे चेहरे दिसतील, असे संकेतही राज यांनी दिले. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून यापुढील काळात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला जाणार आहे यासाठी मोबाईल क्रमांकही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.