पुणे : भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असेल आणि याचे पुरावे असतील तर, खरे काय ते लोकांसमोर यायला हवे. सरकार कुठलेही असो भूमिका योग्य हवी, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. संभाजीराजे यांनी बुधवारी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळास भेट दिली. या मंडळाच्यावतीने सध्या चक्री उपोषण सुरु असून, उपोषणकर्त्यांची त्यांनी भेट घेतली व याप्रश्नी लक्ष घालू, असे आश्वासन दिले.
टिळकांनी गणेशोत्सवाचा प्रचार, प्रसार केला!
सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सुरु केल्याचे पुरावे आहेत, तर याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावे लागेल असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. यावेळी भाऊसाहेब रंगारी मंडळातील कार्यकर्त्यांनी त्यांना सर्व पुराव्यांची माहिती दिली. तसेच त्यांनी सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचेही सांगितले. संभाजीराजे म्हणाले, की खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे, खरे काय ते लोकांसमोर यायला हवे. सरकारने याची दखल घ्यायला हवी. सर्व पुरावे उपलब्ध आहेत, इथे श्रेयवादाचा विषय आहे. सरकार कुठलेही असो भूमिका योग्य हवी. टिळकांनी गणेशोत्सवाचा प्रचार, प्रसार केला यात शंका नाही. भाऊसाहेब रंगारी यांची दखल घेणे गरजेचे आहे. 1892 मध्ये इकोफ्रेंडली त्यांनी गणशोत्सव सुरु केला होता. केसरीमध्येसुद्धा याची दखल घेतली होती, असेही संभाजीराजे म्हणाले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्याचे पुरावे मंडळाकडे आहेत. त्यावेळी दैनिक केसरीमध्येही भाऊसाहेबांनी गणेशोत्सव सुरू केल्याचा लेख प्रसिद्ध झाला आहे. मात्र, लोकमान्य टिळकांनी 1893 साली सुरू केलेल्या गणेशोत्सवाप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव रौप्यमहोत्सवी म्हणून महापालिकेतर्फे साजरा केला जात आहे. त्यामुळे भाऊसाहेब रंगारी यांनी सुरु केलेला गणेशोत्सव दुर्लक्षित करण्याचा प्रकार घडत आहे. गणेशोत्सवासंबंधीचा खरा इतिहास लोकांसमोर आणणे माझी जबाबदारी आहे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन योग्य इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचविणार आहे. यासंबंधी असलेला शासकीय पुरावाही मी त्यांच्यासमोर मांडणार आहे.
– खा. संभाजीराजे