रंगावलीतून साकारला शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट

0

मुंबई । शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त विक्रोळी येथील शिवसेना शाखा क्र. 119 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणार्‍या रांगोळीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पुढील पाच दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. कलाविष्कार अकादमीच्या कलाकारांनी या रांगोळी साकारल्या असून याचे उद्घाटन शिवसेना नेत्यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. या रांगोळी प्रदर्शनात बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह मीनाताई ठाकरे यांचीही सुंदर रांगोळी कलाकारांनी साकारली आहे. त्याचबरोबर बिग-बी अमिताभ बच्चन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या भेटीचे चित्रही रांगोळीतून या कलाकारांनी हुबेहूब साकारले आहे.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा येथील चित्र, शिवाजी महाराज यांचे चित्र अशाही विविध सोळा प्रकारच्या रांगोळ्या इथे रांगोळीप्रेमींना पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाचे आयोजन शिवसेनेच्या या विभागातील सर्व पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन केले आहे. हे रांगोळी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकार्‍यांनी मेहनत घेतली आहे. हे रांगोळी प्रदर्शन मुंबईकरांनी नक्की पाहण्यास यावे, अशी विनंती या विभागातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.