नवापूर । नवापूर शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी रंगावली नदी सध्या प्रचंड दूषित झाली आहे. नदीपात्रात निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे नदीचे अस्तित्त्वच धोक्यात आले आहे. एकेकाळी निसर्ग सौंदर्याचा उत्तम नमुना असलेली रंगावली नदी आता मात्र, अस्तित्त्वासाठी झटत असल्याचे चित्र आहे. नदी पात्रातील अस्वच्छतेमुळे पर्यावरणाचा र्हास होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. नदीपात्रात सर्वत्र सांडपाणी, त्यामुळे वाढलेली विषारी झाडे-झुडूपे, मेलेल्या प्राण्यांचे अवशेष पडलेले असतात. असेच चित्र काही दिवस सुरू राहिले तर नदी नामशेष होण्याची भीती आहे. त्यामुळे नदी संवर्धनासाठी आताच काहीतरी पावले उचलण्याची गरज आहे, असे मत पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
अतिक्रमण हटविण्याचीही मागणी
नदीपात्रात काहिंनी अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमणदेखील काढण्याची गरज आहे. काही जणांनी नदीपात्रात अतिक्रमण करून जमीन हडपण्याचा डाव आखला आहे. या विषयाकडेही नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. नदीपात्र स्वच्छ करण्याची कोणतीही प्रशासकीय तरतूद नसल्याचे बोलले जाते. दरम्यान नगरपालिकेने या विषयाकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. अतिक्रमणामुळे नदीपात्रात अनेक ठिकाणी जागा अरुंद झाली आहे.
अस्वच्छतेमुळे दुर्गंधी
नदीपात्रात उगवलेल्या झाडे-झुडुपांमध्ये विषारी सर्प आणि कीड्यांचा संचार आहे. यामुळे नदीलगत राहणार्यांच्या जिवास धोका आहे. अस्वच्छतेमुळे नदी पात्रातून येणार्या दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्मशानभूमीकडे जाणारे नदीपात्रालगत आल्यावर तोंडावर रुमाल बांधून स्मशानभूमीकडे जातात. नगरपालिकेने रस्ते, वीज व इतर विकास कामे सध्या बाजुला करावी. ही कामे तर सुरुच राहतील. नगरपालिका प्रशासनाने आधी नदी पात्रातील घाण स्वच्छ करुन सांडपाण्याची वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.
रंगावली नदीपात्रात सांडपाणी जाते. त्यावर उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. 76 लाख रुपये खर्चाची पाईपलाईन रंगावली पात्रालगत असलेल्या देवळफळी ते स्वस्तिक काँजवेपर्यंत टाकण्यात आली आहे. आता तेथून स्मशानभूमीपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. याचे टेंडर काढण्यात आले आहे. पाईपलाईन टाकल्यावर शहरातील सांडपाणी चेंबर बनवून ते वेगळे करण्यात येणार आहे. यामुळे नदीपात्रात सांडपाणी जाणार नाही. येत्या 4 महिन्यात रंगावली नदी सांडपाणी मुक्त स्वच्छ व सुंदर करु.
-हेमलता पाटील, नगराध्यक्षा, नवापूर नगरपालिका