पुणे । भाऊ आणि बहिण्याच्या नात्याला घट्ट करणारा आणि त्यांना प्रेमाच्या धाग्यात आयुष्यभर बांधून ठेवणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने विविध प्रकाराच्या राख्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. रक्षाबंधन जवळ आल्याने शहराच्या मध्यवर्ती परिसरात व प्रमुख बाजार पेठांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा राख्यांचे छोट मोठे स्टॉल उभारण्यात आले असून नागरीक देखिल आवडीप्रमाणे राखी खरेदी करण्यासाठी आता गर्दी करू लागले आहेत.
दूर राहणार्या भावाला राखी पाठविण्यासाठी महिलांनी खरेदी सुरू केली आहे.
गणपती, ओम, रुद्राक्षच्या राख्या
बाजारपेठेमध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या दिसून येत आहेत. गोल्डन झालर असलेल्या राख्या, मणी, मोती, रंगीबेरंगीे खड्यांची डिझाईन असलेली राखी, स्वस्तिक, गणपती, ओम, रुद्राक्ष लावलेल्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. अलीकडे गोंड्याची राखी फारशी चालत नाही, पण काही दुकानदारांकडे चमकीचा कागद लावलेले मध्यम आकाराचे तसेच छोटे गोंडे उपलब्ध आहेत. देवाला बांधायची राखी म्हणजे देव गोंडा. ही राखीही बाजारात आहे. मारवाडी समाजात महिलांना बांधली जाणारी लुंबा राखी 20 ते 60 रुपयांपर्यंत आहे. काही वर्षांपूर्वीच्या चंदेरी-सोनेरी चमकीचे कागद, प्लॅस्टिकची फुले, रंगीत स्पंज गुंफलेल्या मोठ्या राख्या मात्र बाजारात दिसेनाशा झाल्या आहेत. 5 रुपयांपासून 50 ते 80 रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. गोल्डन झालर असलेल्या व रंगीबेरंगी खड्याची डिझाईन असलेल्या राखीची किंमत यंदा वाढली आहे. 40 ते 100 पर्यंत या राख्या उपलब्ध आहेत. तसेच चांदीची कोंटिंग असलेल्या राखीला सुद्धा यंदा बाजारात जास्त मागणी आहे.
राखीत अवतरला बाहुबली
बच्चे कंपनीसाठी कार्टुन्सची छबी असलेल्या अन् खेळणे असलेल्या राख्या उपलब्ध आहेत. तसेच विविध पोज मधला छोटा भीम, बाहुबली, भीम अँड बाल गणेश, भीम अँड फ्रेन्ड्स, टॉम अँड जेरी, अँग्री बर्ड, डोरेमॉन, मोटू-पतलू, टेडी या कार्टून्स असलेल्या राख्यांना यंदा जास्त मागणी आहे. काही राख्यांमध्ये बटण दाबले की लाइट लागते. छोट्यांच्या राख्यांची किंमत 30 ते 80 रुपयांपर्यंत आहे.
खरेदीदारांचा उत्साह कायम
छोटा भीम, डॉरेमॉन, शिंचॅन, बेनटेन, स्पायडर मॅन, या राख्यांबरोबर खडे, मोती, हिर्यांच्या राख्यांना ग्राहकांची मागणी आहे. यंदा राख्यांच्या किमंतीमध्ये वाढ झाली असली तरी नागरीकांमधील उत्साह कमी झालेला नाही.
-सखाराम काळे, विक्रेते
बटरस्कॉच राखी
आपल्या लाडक्या भावाला काही खास राखी द्यावी, अशा विचारात कोणी असेल तर त्यांच्यासाठी चॉकलेट राखी, बटरस्कॉच राखीही बाजारातल्या मिठाईंच्या दुकानात उपलब्ध आहेत. आपल्या नेहमीच्या राखीवरच हा नवीन प्रकार खास शोधून काढला आहे. मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही या राख्यांचे आकर्षण दिसून येते.
भेटवस्तू खरेदीसाठी दादांची लगबग
या सणानिमित्त भाऊ आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन बहिणीला देतो. ओवाळणी रिकामी ठेवू नये असे म्हणतात, त्यासाठी बहिणीला भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. भाऊरायाही आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू देण्यासाठी घराबाहेर पडला आहे. जशी महिलांमध्ये राखी खरेदी करण्याचा उत्साह आहे. तसाच उत्साह मुलांमध्येही पाहायला मिळतोय. आकर्षक भेटवस्तू देता यावी, यासाठी विविध कंपन्या जाहिरातीच्या माध्यमातून मुलांना आकर्षिक करत असतात.