शिक्रापूर । मानवाचे शरीर सदृढ ठेवण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपल्यासह इतरांना सहकार्य करून सामाजिक कार्य केले पाहिजे. रक्तदान करणेही काळाची गरज बनली आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे, असे प्रतिपादन शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी केले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे अजिंक्यतारा इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, भोसरी शाखेच्या वतीने तसेच ससून रक्तपेढी यांच्या विशेष सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये 120 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रामभाऊ सासवडे बोलत होते. यावेळी सासवडे यांनी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन गेल्या तीन वर्षांपासून शिक्रापूर भागामध्ये विविध उपक्रम राबवीत असून कित्येकदा गावामध्ये स्वच्छता करून त्यांनी विकासाला हातभार लावल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सेक्टर संयोजक अंगद जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. जोगेंदर सिंग, शिक्रापूरचे प्रमुख जयराम सावंत, माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, भाऊसाहेब कापरे, पिंपळे जगतापचे माजी सरपंच शिवाजी जगताप यावेळी उपस्थित होते.