संत निरंकारी फाऊंडेशनने राबविला उपक्रम
रावेत : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वाल्हेकरवाडी येथील स्वयंसेवकांनी 3000 पेक्षा जास्त घरांना भेटी देऊन रक्तदाना विषयी जनजागृती केली. 4 नोव्हेंबरला रक्तदान शिबीर आहेर गार्डन मंगल कार्यालय, वाल्हेकरवाडी या ठिकाणी होणार आहे. वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, रजनीगंधा सोसायटी इत्यादि ठिकाणी जाऊन रक्तदानाचा संदेश दिला. यामध्ये 100 हून जास्त स्वयंसेवक आणि सेवादल कार्यकर्ते सहभागी होते. ही मोहीम गेल्या सहा दिवसांपासून नियमित चालू असून युवा तसेच महिलांचा मोठा सहभाग होता. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण रक्त तयार करू शकत नाही, त्यामुळे रक्तदानाच्या माध्यमातूनच ते मिळवू शकतो. मोठ्या सर्जरीच्यावेळी, गंभीर परिस्थितीसाठी, गरोदरपणात आई व बाळासाठी रक्ताची खूप गरज निर्माण होते. यासाठी रक्तदान करणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा
सकारात्मकता वाढीस लागते
नागरिकांनी विचारले की, आम्हीच का रक्तदान करायचं? तर असे आहे की, आजच्या युगात प्रत्येकजण कामासाठी बाहेर पडतो आहे. मला गरज पडत नाही, म्हणून मी रक्त दान करणार नाही, असे म्हणून चालत नाही. आजच्या स्वार्थी जगात कोण कुणाला रक्त देईल. पण रक्तदान केल्याने हृदयाचे कार्य सुधारते शिवाय एकदा दिलेलं रक्त 3-4 वेगवेगळ्या रुग्णांना वापरलं जाते. त्यामुळे एका वेळी 4 लोकांचं प्राण वाचवल्याचे विलक्षण समाधान मिळते. तसेच सकारात्मकता वाढिस लागते या सारखे अनेक फायदे रक्तदात्याला होत असतात. संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये एप्रिल 2018 पासून आत्तापर्यंत 12 शिबिरे पार पडली. यामध्ये 4221 युनिट रक्त संकलित केले अशी माहिती फाउंडेशनच्या मार्फत दिली. येत्या 4 नोव्हेंबरला होणार्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून सर्वानी योगदान द्यावे असे आवाहन रामचंद्र लाड यांच्याकडून करण्यात आले.