रक्तसंक्रमण मार्गदर्शनाचा अभाव

0

नागपूर । थॅलेसेमिया, सिकलसेलशी झुंजणार्‍यांना रक्ताची सातत्याने गरज भासते. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरही रक्त संक्रमित करतात. गरज नसताही जोखीम नको म्हणून रक्ताचा वापर वाढतो. यात काही अंशी तथ्य आहे. त्यामुळे सुरक्षित रक्तसंक्रमणाच्या बाबतीत दिशादर्शक तत्त्वांची गरज आहे. ती काटेकोरपणे पाळली गेली पाहिजे’, असे ठाम मत ज्येष्ठ संक्रमणतज्ज्ञ डॉ. आनंद देशपांडे यांनी व्यक्त केले. राज्य सरकारचे अन्न व औषध प्रशासन, इंडियन सोसायटी ऑफ ट्रान्सफ्युजन मेडिसिन आणि ब्लड बॅँक फेडरेशनच्या सहकार्याने दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त नागपुरात पत्रकारांशी बोलताना हे विवेचन केले.

लोकसंख्येच्या 10 टक्के रक्ताची गरज
आपल्याकडे साधारणपणे सरासरी लोकसंख्येच्या 10 टक्के नागरिकांना रक्ताची गरज भासते. त्या तुलनेत जेमतेम 9 टक्के रक्त संकलित होते, असे नमूद करीत डॉ. देशपांडे म्हणाले, ‘रक्तसंक्रमणानंतर आजार संक्रमणाची जोखीम असते. रिअ‍ॅक्शनही होते. दोन्ही बाबी गंभीर आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील रक्तसंक्रमणाच्या बाबतीत नियम ठरवून दिले आहेत. गरज पडेल तेव्हा रक्तदान करण्यापेक्षा नियमित तीन महिन्यांनी रक्तदान करणार्‍यांची संख्या वाढली तर सुरक्षित रक्तसंक्रमणाचे उद्दिष्ट गाठणे सोपे होईल. कारण अशा व्यक्तींचा डाटा तयार असतो. जोखीमही कमी असते. एकट्या मुंबईचा विचार केला तर मुंबईत 62 रक्तपेढ्यांची गर्दी आहे. प्रत्येक रक्तपेढीच्या रक्ताचा दर्जा आणि दर वेगवेगळे आहेत.

परदेशात रक्तसंकलनाचे जाळे
परदेशातील रक्तपेढी आणि देशातील स्थिती याची तुलना करताना जागतिक आरोग्य संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार डॉ. संजय जाधव म्हणाले, ‘लंडनचा व्याप मुंबईहून मोठा आहे. अवाढव्य आणि व्यस्त राहणार्‍या या शहरात एकच रक्तपेढी आहे. पण तरीही रक्तावाचून तडफडून कोणीही गतप्राण होत नाही. रक्तसंकलन आणि विपणनाच्या नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. परदेशात रक्तपेढ्यांचे नव्हे तर रक्तसंकलनाचे जाळे आहे. त्याला रक्तसंकलन टीम म्हटले जाते.

प्रत्येक रुग्णालय जुळलेले
ज्या ज्या ठिकाणी रक्ताची गरज भासते असे प्रत्येक रुग्णालय या केंद्राशी जुळलेले असते. सातत्याने रक्ताची गरज भासणार्‍यांची अद्ययावत माहिती या कें द्राकडे असते. शहरातील टीमकडून संकलित होणारे रक्त एकाच ठिकाणी साठविले जाते. एकाच दर्जेदार पद्धतीने त्याची तपासणी करून रुग्णालयांना गरजेनुसार रक्तपुरवठा होतो.’थेंब न् थेंब तंतोतंत तपासला जातो टाटा चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रान्सफ्युजन विभागाचे प्रमुख डॉ. सुनील राजाध्यक्ष म्हणाले, ‘परदेशात रिजनल ब्लड कलेक्शन सेंटर्स कार्यरत आहेत. भारताच्या तुलनेत तेथील रक्ताचा दर्जा आणि दर यात 15 ते 20 पटींचा फरक आहे. परदेशात रुग्णाला संक्रमित होणारा रक्ताचा थेंब न थेंब विघटन आणि चाचण्यांमधून तंतोतंत तपासला जातो. आपल्याकडील रक्तसंकलनाच्या विकेंद्रीकरणामुळे सुरक्षित रक्तसंक्रमण होत नाही.