रक्ताचे नाते चॅरीटेबल ट्रस्टचा पुढाकार ; 2 ते 10 मे दरम्यान प्रत्येक जिह्याला भेट देवून साधताहेत संवाद ; रविवारी जळगावात कार्यक्रम घेवून जाणून घेतली माहिती
जळगाव : उन्हाळ्यात स्व:इच्छेनुसार रक्तदान करणार्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये 50 टक्के घट झाली आहे. त्यामुळे रुग्णांना रक्तपेढ्यांमध्ये रक्त उपलब्ध होत नाही, नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी तसेच रक्तदान एक चळवळ म्हणून राज्यभरातील रक्तदाते व ब्लड बँका यांचे संघठन व्हावे, यासाठी पुणे येथील रक्ताचे नाते या चॅरीटेबल ट्रस्टतर्फे राज्यभर भेटी देत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमिवर रविवारी ट्रस्टचे महेश बांगड व त्यांची बहिणी स्नेहल बांगड यांनी जळगावला भेट देवून माहिती जाणून घेत कार्यक्रमातून मार्गदर्शन केले.
पुणे येथील महेश बांगड व त्यांची बहिण स्नेहल बांगड या दोघांकडून विविध शहरात जनजागृती करण्यात येत आहे. रविवारी दोघांनी जळगाव येथील रेडक्रास सोसायटीच्या रक्तपेढीला भेट दिली. तसेच येथे आयोजित कार्यक्रमात दोघांनी रक्तदानाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी रेडक्रासचे उपाध्यक्ष गणी मेमन, सचिव राजेश यावलकर यांनी दोघांचा सत्कार केला. भावंडांनी शहरातील इतर खाजगी ब्लड बँका, व रेडक्रॉस सोसायटीची भेट घेवून रक्तदात्यांची माहिती घेवून संवाद साधला. तसेच त्यांनी त्यांच्या अभियानाबाबत तसेच ट्रस्टच्या उद्देशाबद्दल मार्गदर्शनही केले.
ब्लड लाईन महाराष्ट्र उपक्रम
पुणे येथील रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे महेश बांगड व स्नेहल बांगड यांनी ब्लड लाईन महाराष्ट्र हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत दोघे भाऊ- बहिण महाराष्ट्रातील विविध शहरामध्ये जाऊन तेथील ब्लड बँकांची भेट घेत आहे. तसेच रक्तदान चळवळीची संबंधितांबरोबर संवाद साधत आहे. दि.2 ते 10 मे दरम्यान ते राज्यातील 20 शहरामध्ये जाऊन जनजागृती करणार आहेत. यात पुण्यापासून दौर्याला सुरुवात झाली आहे. अद्यापर्यंत सोलापूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, अकोला या ठिकाणी बांगड भावंडांनी भेटी दिल्या आहेत. रविवारी त्यांनी जळगावात कार्यक्रम घेतला. पुढील टप्प्यात ते औरंगाबाद, जालना, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, नवी मुंबई, लोणावळा, कराड, इचलकरंजी, कोल्हापूर आदी शहरामधील विविध ब्लड बँकांना भेट देवून जनजागृतीपर कार्यक्रम तसेच रक्तदान शिबीर घेणार आहेत
कोणत्याही जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा पडू नये
सध्या परिस्थितीत रक्तदान शिबिर घेणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे ब्लड बँकामध्ये रक्त उपलब्ध नाही, म्हणून रक्तदान शिबिरांची संख्या वाढावी, तसेच राज्यात कोणात्याही रुग्णाला रक्ताचा तुटवडा निर्माण होणार नाही, असा उपक्रमाचा उद्देश असून दौरा सुरु असल्याचेही महेश बांगड, स्नेहल बांगड यांनी बोलतांना सांगितले.