रक्षा खडसे यांनीही घराणेशाहीतून मिळवली खासदारकी

0
काँग्रेस पदाधिकार्‍यांनी लगावला टोला ; मुक्ताईनगरात पत्रकार परीषद
मुक्ताईनगर:- न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरुन खासदार रक्षा खडसे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींवर टिका केली होती. या बाबीचा समाचार घेताना काँग्रेस पदाधिकार्‍यांनी पत्रकार परीषदेत रक्षा खडसे यांनीही घराणेशाहीतून खासदारकी मिळाल्याचे सांगत त्यांना राहुल गांधीविषयी बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगितले. जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी शनिवारी पत्रकार परीषद घेतली.
खासदारांचे पत्रक हास्यास्पद
न्या.लोया प्रकरण हा देश पातळीवरचा विषय असतांना व खासदार खडसे यांच्या अखत्यारीतील विषय नसतांना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, असे पत्रक काढण्याचा खासदार खडसे यांचा प्रकार हास्यास्पद असल्याचेे पदाधिकारी म्हणाले. राहुल गांधी यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करणार्‍या खासदार खडसे यांचे स्वतःचे कर्तृत्व काय आहे? असा प्रश्‍न विचारत त्यांनीदेखील घराणेशाहीनेच खासदारकी मिळविली आहे, असा टोला काँग्रेस पदाधिकार्‍यांनी लगावला. काँग्रेस पक्षाने मागासवर्गीय व अल्पसंख्यांकांसाठी जे केले त्याचा अभ्यास न करता खासदारांनी केलेला आरोप हास्यास्पद असल्याचे पदाधिकारी म्ळणाले.
खासदारांनी मांडावा कामांचा लेखाजोखा
देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत आहेत, अपयशी पंतप्रधान पीक विमा योजना, सीमेवरील 700 जवान शहीद होणे, रेल्वेची भाडेवाढ तसेच चिखली ते तरसोद या रस्त्याचे तीन वर्ष काम का रखडले या विषयावर खासदारांनी कोणते प्रश्न मांडले ? हे जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी मागणी जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील व तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केली.  जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, प्रभाकर पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसीफ खान ईस्माईल खान, बी.डी.गवई हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
तिकीट देणे हा पक्षाचा निर्णय – खासदार खडसे
जनतेप्रती आधी बांधीलकी ठेवून त्यांची सातत्याने कामे केल्याने पक्षाने आपल्याला खासदारकीचे तिकीट दिले त्यामुळे घराणेशाहीचा आरोप करणे हास्यास्पद असल्याचे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. राहुल गांधींनी देखील पंतप्रधानांवर आरोप केले आहेत मग हे संयुक्तिक आहे का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी हे आपल्यासोबत लोकसभेत खासदार म्हणून काम करतात, असेही त्या म्हणाल्या.