लंडन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर लवकरच इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर होण्याची शक्यता आहे. राजन यांचे नाव इंग्लंडच्या गव्हर्नर पदाच्या शर्यतीत आहे. बँक ऑफ इंग्लंड ही अतिशय प्रतिष्ठित संस्था मानली जाते. इंग्लंडमधील सर्व बँकांचे नियंत्रण या बँकेकडून केले जाते. लंडनमधील फायनान्शियल टाईम्सने यासदंर्भात वृत्त दिले आहे. इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेने नव्या गव्हर्नरचा शोध सुरू केला आहे. नवे गव्हर्नर पुढील वर्षापासून बँकेची सूत्रे हाती घेतील. सध्या मार्क कार्ने इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहात आहेत. त्यांचा कार्यकाळ जून 2019 ला संपेल. कार्ने यांनी 2013 मध्ये मध्यवर्ती बँकेची धुरा खांद्यावर घेतली होती. कार्ने यांच्या निमित्ताने गेल्या तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच बँकेची जबाबदारी परदेशातील व्यक्तीकडे गेली. इंग्लंडचे अर्थमंत्री फिलिप हेमंड यांनी गव्हर्नरपदावर नव्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचे संकेत दिले आहेत. कार्ने यांच्या उत्तराधिकार्याचा शोध सुरू असून ती व्यक्ती परदेशीही असू शकते, असे हेमंड यांनी म्हटले आहे.