नवी दिल्ली। सुपरस्टार रजनीकांत यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरून तामिळनाडूतील राजकारण तापले आहे. रजनीकांत यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलणे टाळले असले तरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) भाजपवर निशाणा साधला आहे. रजनीकांत यांच्या माध्यमातून भाजपचा तामिळनाडूत चंचूप्रवेश करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप माकपने केला आहे. रजनीकांत खूपच समजुतदार आहेत. त्यांना येथील सांस्कृतिक इतिहास ठाऊक आहे. भाजपच्या राजकारणाला ते कधीच थारा देऊ शकत नाहीत, असे माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा म्हणाले.
तामिळनाडूत एआयएडीएमके आणि डीएमके या दोन प्रादेशिक पक्षांचे चांगलेच वर्चस्व आहे. मात्र, त्या तुलनेत भाजपचे अस्तित्व खूपच कमी आहे. त्यात तमिळचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावरून माकपने भाजपवर निशाणा साधला आहे. रजनीकांत यांच्या भाजप प्रवेशाबाबत मीडियात तर्कवितर्क लढवले जात असले तरी रजनीकांत यांना पक्षात घेण्याची भाजपला घाई झाली आहे. त्यासाठी ते रजनीकांत यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे यातून दिसून येते, असा आरोपही डी. राजा यांनी केला आहे.