रजनीकांत राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत

0

सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांत राजकारणात येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्याविषयी खुलासा करतांना रजनीकांत यांनी ‘मी काही राजकीय नेत्यांसोबत चर्चा केली. राजकीय नेत्यांना भेटल्याचे मी नाकारत नाही. आम्ही चर्चा करत आहोत आणि याबद्दल निर्णय झाल्यावर त्याची घोषणा करण्यात येईल,’ असे म्हटले. आठवड्याच्या सुरुवातीला रजनीकांत यांनी हिंदू मक्कल कच्छी संघटनेच्या सदस्यांची निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मागील महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना ‘देवाची इच्छा असेल तर आपण राजकारणाची वाट धरु,’ असे म्हटले होते. ‘आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपण काय करायचे, हे देवच ठरवत असतो. आता देवाला मी अभिनेता म्हणून काम करावे असे वाटते. मी माझी जबाबदारी निभावतो आहे. जर देवाची इच्छा असेल, तर मी उद्या राजकारणात उतरेन. जर मी राजकारणात प्रवेश केला, तर अत्यंत प्रामाणिकपणे काम करेन. पैशांसाठी राजकारणात येणार्‍यांना मी स्थान देणार नाही. अशा लोकांसोबत काम करण्याची माझी इच्छा नाही,’ असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.