जळगाव । मेहरूण मधील संतोषी माता मंदीरासमोर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास बुलेट वाहन चोरून नेल्याची घटना घटली असून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरीफ सलिम पिंजारी (वय- 33) रा. संतोषी माता मंदीर, मेहरूण यांनी नगरसेवक इब्राहिम मुसा पटेल यांच्या घराजवळ रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट क्रमांक (एमएच 19 सीई 1500) गाडी 21 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता लावली, दुसर्या दिवशी 22 जुलै रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास दुचाकी मिळून आली नाही. बुलेट गाडीचा इतरत्र शोध घेतला मात्र मिळाली नाही. त्यानुसार आज सकाळी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात दुचाकी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे. शुक्रवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी गाडीच्या शोध घेण्यासाठी रवाना झाले होते. दरम्यान दुपारी चोरीस गेलेली बुलेट ही भारत गॅस जवळील खदाणीत मिळून आली असल्याची माहिती सहाय्यक फौजदार अतूल वंजारी यांच्याकडून मिळाली.