रजिस्ट्रेशन बंदविरोधात ग्रामीण भागातील बिल्डर एकवटले

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार

कल्याण – 27 गावातील रजिस्ट्रेशन बंद करण्यात आल्यानंतर येथील बांधकाम व्यासायिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. याबाबत सोमवारी 27 गावातील बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येऊन संघटना स्थापन करत सभेचे आयोजन केले होते. या सभेत संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांसह नगरसेवक कुणाल पाटील, गणेश भाने, जालिंदर पाटील उपस्थित होते. तर आमदार गणपत गायकवाड हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या रजिस्ट्रेशन सुरू करण्याची मागणी केली असता आमदार गणपत गायकवाड यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असून याबाबत येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून लवकरच रजिस्ट्रेशन सुरू करण्यात येईल असे आश्‍वासन दिले. 27 गावांच्या नगरपालिकेच्या मागणीबाबत मी जरी विरोधात असलो तरी मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील या गावांची स्वतंत्र नगरपालिका होणार असे स्पष्ट केले.

नांदीवलीमध्ये साई हॉलमध्ये पार पडली बैठक
गेल्या महिनाभरापासून कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील 27 गावामधील रजिस्ट्रेशन बंद करण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे . आडीवली ढोकळी बिल्डर्स असोसिएशन नावाने संस्था स्थापन करत त्या माध्यमातून शासकीय भूखंडवरील बांधकामांचे रजिस्ट्रेशन बंद करा पण सातबार्‍याच्या जागेवरील रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू करण्याबत प्रयत्न सूरु करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर नांदीवली येथील साई हॉलमध्ये बांधकाम व्यवसायिकांची सभा झाली. या सभेत संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, अर्जुन बुवा चौधरी, बळीराम तरे, नगरसेवक कुणाल पाटील, नगरसेवक गणेश भाने, नगरसेवक जालिंदर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार गणपत गायकवाड हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेत रजिस्ट्रेशन बंद करणे हा आमच्यावरील अन्याय असून रजिस्ट्रेशन सुरू करण्याची मागणी केली.