पुणे । मराठी चित्रपट सृष्टीत नेहमीच रडविण्याच्याच भूमिका माझ्या वाट्याला आल्या परंतु मी अनुभवाने सांगते रडविण्यापेक्षा हसविणे ही सर्वांत मोठी कला आहे. तुमच्या विनोदात तीव्रता असल्याशिवाय श्रोते, प्रेक्षक प्रतिसाद देत नाहीत, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी बुधवारी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ एकपात्री कलावंत आणि हास्यकवी बण्डा जोशी यांच्या हास्यपंचमी या एकपात्री कार्यक्रमाच्या 5000वा गौरवशाली प्रयोगानिमित्त डॉ.डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांच्या हस्ते जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. प्रमोद आडकर, सचिन ईटकर, सुनील महाजन, सुनीताराजे पवार, संतोष चोरडिया, भाग्यश्री देसाई आदी उपस्थित होते.
जोशी म्हणाले, शाळेत असताना कवितांचे विडंबन करण्याची खोड होती. परंतु या खोडीला शिक्षकांनी आणि आईने योग्य वळण दिल्याने मी एवढा प्रवास करू शकलो. महाविद्यालयीन जीवनात स्टेजवर वावरण्याच्या सवयीमुळे आयुष्यातही स्टेज माझ्याकडून सुटला नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले. सत्कार समारंभानंतर जोशी यांच्या हास्यपंचमी या एकपात्री कार्यक्रमाचा 5000वा गौरवशाली प्रयोग सादर झाला.
दिग्गजांची हसविण्याची दीर्घ परंपरा
डॉ. पाटील म्हणाले, कलाकारांची जी भूमिका रसिकांच्या मनपटलावर उमटलेली असते ती भूमिका त्यांना निभवावीच लागते. हसविण्यास प्रवृत्त करणार्या कलेचे समाजाने स्वागत केले पाहिजे. पु.ल. देशपांडे, प्र.के. अत्रे, लक्ष्मण देशमुख यांसारख्या दिग्गजांची हसविण्याची आपणांकडे दीर्घ परंपरा आहे, जोशी ती परंपरा पुढे नेतील यात
शंका नाही.
कित्येकांचे आयुष्य वाढले
यावेळी काळे म्हणाल्या, मला इच्छा असूनही विनोदी भूमिका मिळाल्या नाहीत. हसण्याने आयुष्य वाढते, असे म्हणतात या हास्यपंचमीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोशी यांनी त्यांच्या आयुष्यासोबतच किती जणांचे आयुष्य वाढविले, खुलविले, फुलविले याचा त्यांना देखील अंदाज नसेल.