चिंचवड । टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा व नवनिर्वाचित अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत टाटा मोटर्सच्या पिंपरी प्रकल्पातील कामगारांनी गेले चार दिवस सुरू असलेले आंदोलन अखेर सोमवारी मागे घेतले. प्रलंबित वेतनवाढ करार लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन चंद्रशेखरन यांनी यावेळी कामगारांना दिले. टाटा मोटर्स कंपनीतील प्रलंबित वेतन कराराचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, या मागणीसाठी टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या वतीने कंपनीच्या आवारातच गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू होते. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोमवारी प्रथमच पिंपरी प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्या समवेत नवनिर्वाचित अध्यक्ष एन. चंद्रशेखरन हेही होते. युनियनचे अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष संजय काळे व सरचिटणीस सुरेश जासूद यांच्यासह युनियनच्या पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतली.
कामगारांच्या आंदोलनाने दु:ख
कंपनीत लोप पावत चाललेली टाटा संस्कृती पुन्हा वाढावी आणि व्यवस्थापन-कामगारांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, अशी चर्चा यावेळी झाली. रखडलेला वेतनवाढ करार लवकरात लवकर व्हावा, अशी मागणीही युनियनच्या वतीने करण्यात आली. कामगारांच्या आंदोलनामुळे दुःख होत असल्याची भावना रतन टाटा यांनी यावेळी व्यक्त केली. कंपनीत पूर्वीप्रमाणेच टाटा संस्कृती जोपासण्याचा आपण प्रयत्न करू, असे आश्वासन चंद्रशेखरन यांनी दिले. रतन टाटा व चंद्रशेखरन यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कामगारांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.